पंढरपूर (वृत्तसंस्था) मंगळवेढा तालुक्यातील मरवडे येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. अन्नातून झालेल्या विषबाधेमुळे दोन सख्या बहिणीचा मृत्यू झाल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.
यासंदर्भात अधिक असे की, भक्ती आबासाहेब चव्हाण (वय- ६) व नम्रता आबासाहेब चव्हाण (वय-४) या दोन चिमुकल्या मुलींचा मृत्यू झाल्याने सर्वत्र खळबळ उडाली आहे. मरवडे येथील आबासाहेब चव्हाण यांनी आपल्या भक्ती व नम्रता या लहान मुलींसाठी मंगळवारी मंगळवेढा येथील एका दुकानातून खाऊ आणला होता. हा खाऊ खाल्यानंतर चव्हाण कुटूंबातील सर्वांनाच अस्वस्थ वाटू लागल्याने त्यांनी मंगळवेढा व पंढरपूर येथील खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल झाले.
उपचारादरम्यान गुरुवारी पहाटे आबासाहेब चव्हाण यांची मोठी मुलगी भक्ती हिचा मृत्यू मंगळवेढा येथील खाजगी दवाखान्यात झाला तर दुसरी मुलगी नम्रता हिचा मृत्यू गुरुवारी मध्यरात्री पंढरपूर येथील खाजगी दवाखान्यात उपचारादरम्यान झाला. मयत मुलीचे वडील आबासाहेब व आई सुषमा यांच्यावर देखील उपचार सुरु आहेत. या घटनेचा मंगळवेढा पोलीस ठाण्याकडून तपास केला जात आहे.