चाळीसगाव (प्रतिनिधी) येथील तितूर नदीत पोहायला गेलेल्या दोघा सख्ख्या भावंडांचा पाण्यात बडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. साहिल शहा शरीफ शहा फकीर (वय १६) आणि अयान शाह शरीफ शाह फकीर (वय १४) अशी दोघा मृत भावंडांची नावे आहेत.
यासंदर्भात अधिक असे की, वाघळी येथील मजुरी काम करणारे शरीफ शाह यांची मुले साहील शरीफ शाह व अयान शाह शरीफ शाह ही दोन्ही भावंडे रविवारी सायंकाळी वाघळी गावाजवळ तितूर नदीपात्रात कमलेश्वर मंदिराजवळील बंधाऱ्याच्या खाली पोहण्यासाठी गेले होते. दोघे भाऊ पोहत असतांना अचानक लहानगा अयान पाण्यात बुडू लागला. साहिलने त्याला वाचविण्यासाठी त्याच्याकडे धाव घेतली. मात्र दोघा भावंडांना बंधाऱ्यातील पाण्याचा अंदाज न आल्याने दोघे भाऊ पाण्यात बुडाले. हा प्रकार लक्षात येताच गावकऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. ग्रामस्थांसह पट्टीच्या पोहणाऱ्यांनी सायंकाळी उशिरापर्यंत दोघा भावंडांचा शोध घेतला. पण सायंकाळी ७ वाजेच्या सुमारास साहिलचा मृतदेह हाती लागला, तर अयानचा मृतदेह मात्र सापडला नाही. त्यातच सायंकाळ झाल्याने व पाऊस सुरू झाल्याने शोधकार्य थांबविण्यात आले.
सोमवारी सकाळी पुन्हा शोध कार्य सुरू असताना हिंगोणे गावाजवळ तेथील महिलांना कपडे धुत असतांना मृतदेह पाण्यात वाहताना दिसला. महिलांनी गावकऱ्यांना ही माहिती दिली. ग्रामस्थांनी नदीपात्रात धाव घेतली असता तो मृतदेह वाघळं येथील अयानचा असल्याचे निष्पन् झाले. हा मृतदेह पाण्यातून बाहेर काढून विच्छेदनासाठी ग्रामीण रूग्णालयात नेण्यात आला. याप्रकरणी चाळीसगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. या घटनेचा पुढील तपास हवालदार जयवंत सपकाळे करत आहेत.