बोदवड (प्रतिनिधी) तालुक्यात आज दुपारी 2 वाजे सुमारास विजेच्या कडकडाटासह सोसाट्याचा वारा सुटला, सोबत आलेल्या पावसामुळे अनेक ठिकाणी नुकसान झाले. तर मनूर बु. येथे गारपीट झाली.
तालुक्यातील हिंगणे येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा छतावरील पत्रे उडाली. मनुर बुद्रुक, खुर्द साळशिगी यासह शहरातील जामनेर रोड, भुसावळ रोड या भागात वादळी पावसामुळे झाडे कोलमडली. तसेच शेतातील झाडे पडली. यामुळे अनेकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. तसेच ऐन लग्नसराईत या आसमानी संकटाने लग्नाचे मंडप सुध्दा उडालेत व लग्नामधील मंडळीचे अतोनात हाल झाले. आजच्या अवकाळी पावसामुळे मोठ्या प्रमाणात शेतकरी व नागरीकांचे मोठ्या प्रमाणात वित्त हानी झाली. झाडे पडल्यामुळे तारा तुटल्याने वीज पुरवठा खंडित झाला असून तो सुरळीत करण्यासाठी वीज वितरण कडून प्रयत्न सुरू आहेत. तालुक्यातील नुकसानी बाबत महसूल विभागातून सक्षम अधिकारी नसल्याने कोणत्याही प्रकारची माहिती मिळाली नाही.