चाळीसगाव (प्रतिनिधी) समाजात दहशत निर्माण करणाच्या उद्देशाने सोबत प्राणघातक हत्यारे बाळगून सोशल मीडियावर ते फोटो व्हायरल केल्याप्रकरणी ५ तरुणांविरुद्ध शहर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गुन्हे करणे, गावठी कट्टे, हत्यारे आदी प्राणघातक शस्त्र जवळ बाळगून समाजात दहशत निर्माण करणे याचबरोबर हत्यारांसह केक कापून वाढदिवस साजरे करण्याची सध्या तरूणांमध्ये मोठी क्रेझ निर्माण झाली आहे. अशा प्रकारांना आळा घालण्यासाठी पोलिस अधीक्षक एम. राजकुमार यांच्या आदेशाने सोशल मीडिया मॉनिटरींग सेलची स्थापना करण्यात आली आहे. त्यामुळे पोलिसांची करडी नजर सोशल मीडियावरील विविध घटनांकडे कायम आहे.
पोलिस शिपाई आशुतोष सोनवणे व रवींद्र बच्छे यांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे काही तरुण प्राणघातक हत्यारे जवळ बाळगून त्याचे फोटो सोशल मीडियावर टाकत दहशत निर्माण करत असल्याचे समजले. यानंतर पोलिस निरीक्षक संदीप पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने कारवाई करुन मोईन अशपाक खाटीक (वय १९), नाजीम नजोमुद्दीन खाटीक (वय १९), तनवीर शाकीर खाटीक (वय १८), तरबेज तौकीर खाटीक (वय २४), आयान दयान खाटीक (वय २०) यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्यांनी दोन तलवारी व एक चॉपर असे हत्यारे काढून दिली आहे. ही हत्यारे पोलिसांनी जप्त केली आहे. ही कारवाई पोलिस उपनिरीक्षक सुहास आव्हाड, पोना राहूल सोनवणे महेंद्र पाटील, भूषण पाटील, रवींद्र बच्छे, समाधान पाटील, विजय पाटील, राकेश महाजन, पवन पाटील यांच्या पथकाने केली. चाळीसगाव पोलिसांच्या या कारवाईचे सर्वत्र कौतूक केले जात आहे.