मुंबई (वृत्तसंस्था) मिरा रोडच्या शांती पार्क येथील एका इमारतीचे बांधकाम पूर्ण होण्यापूर्वीच घर खरेदी करण्यासाठी एका वृद्ध महिलेने व्यवहार केला होता. याला दहा वर्षांचा कालावधी उलटला असला, तरी घर देण्यासाठी टाळाटाळ केली जात असल्याने महारेरामार्फत मिरा रोड पोलिस ठाण्यात तक्रार केली होती. त्यानुसार आज विकासकावर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिरा रोडच्या नया नगर परिसरात राहणाऱ्या फरहत अफशान नियाज अहमद यांच्या राहत्या घराची जागा अपुरी पडू लागल्याने, त्यांनी सन २०११ मध्ये कनाकिया येथील एका प्रकल्पात ६२ लाख ४२ हजार रुपयांत एक घर खरेदी करण्याचे निश्चित केले. त्यानुसार घराच्या नोंदणीकरीता स्टॅम्प ड्युटी ३ लाख ७५ हजार रुपये व नोंदणी शुल्क ३४ हजार ४०० रुपयेदेखील जमा केले होते. व्यवहार करताना सन २०१३ मध्ये घराचा ताबा देण्यात येईल, असे विकासकाकडून सांगण्यात आले. परंतु इमारतीचे अर्धवटच बांधकाम झाले असताना घराची एकूण किंमत भरण्याची मागणी विकासकाने केली, अन्यथा घर खरेदीचा व्यवहार रद्द होईल, असे सांगण्यात आले. म्हणून फरहत यांनी ६२ लाख ४२ हजार रुपयांचे चेक विकासकाला दिला. त्यानंतरही विकासकाने डिसेंबर २०१३ पर्यंत घराचा ताबा दिला नाही. याची तक्रार राज्य ग्राहक फोरममध्ये केल्यावर विकासकाने २०१७ मध्ये घराचा ताबा मिळण्यास उशीर झाल्याने महिलेला ११ लाख रुपये भरपाई देण्याचे मान्य केले. परंतु ते देण्यास मागच्या काही वर्षांपासून टाळाटाळ केली जात असल्याने महारेरामार्फत मिरा रोड पोलिस ठाण्यात तक्रार केली होती. त्यानुसार विकासकांवर सोमवारी फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.