मुंबई (वृत्तसंस्था) अकोल्यातील बाळापूरचे शिवसेनेचे आमदार नितीन देशमुख यांच्या पत्नी प्रांजली देशमुख यांनी सिव्हिल लाइन्स पोलीस ठाण्यात पती हरवल्याची तक्रार नोंदवली आहे. तसेच बाळापूरचे शिवसेनेचे आमदार नितीन देशमुख यांचाही फोन सकाळपासून बंद आहे. त्यामुळे पत्नीने ते बेपत्ता झाल्याची तक्रार दिली आहे. दरम्यान, हाच धागा पकडून आता गृहमंत्रालय अॅक्टिव्ह झालं आहे.
आमदारांशी कोणातही संपर्क होत नसल्याने तक्रारीच्या सहाय्याने महाराष्ट्रातून पोलिसांचं पथक सुरतला जाऊ शकतं. देशमुख यांना रुग्णालयात दाखल केल्याची माहिती देखील मिळत आहे. शिंदे यांच्यासोबत गेलेल्या आमदारांना डांबून ठेवल्याचं संजय राऊत यांनी म्हटलं. या आमदारांच्या जीवाला धोका असल्याचंही ते म्हणाले. दरम्यान, गृहमंत्री वळसे पाटील यांनी तत्काळ मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची वर्षा बंगल्यावर भेट घेतली. यानंतर ते तडक मंत्रालयात अजित पवारांची भेट घेतली. यामुळे महाविकास आघाडी एकनाथ शिंदेंच्या राजकारणाला शह देण्याचा प्रयत्न करत आहेत.
काही आमदारांना जबरदस्ती उचलून नेल्याची बाब समोरं आल्यानंतर आता या आमदारांना माघारी आणण्यासाठी सरकारचे प्रयत्न सुरू आहेत. नितीन देशमुख यांच्या पत्नीने दिलेल्या तक्रारीची गृहखात्याने गंभीर दखल घेतली आहे. आतापर्यंत ९ आमदारांच्या वतीने तक्रारी कऱण्यात आल्याचं राऊतांनी सांगितलं.