चोपडा (प्रतिनिधी) ऑनर किलिंगमध्य ठार झालेली तृप्ती अविनाश वाघ (वय २४) ही पुण्यात एम.बी.बी.एस. चे शिक्षण घेत होती. तर तिचा पती अविनाश हा एका कंपनीत नोकरीस होता. विवाहपुर्वीच त्या दोघांच्या कुटुंबामध्ये वैर आणि त्यातच कमी शिकलेल्या मुलासोबत प्रेमविवाह केल्याची सल तृप्तीच्या वडिलांच्या मनात होती. याच कारणावरुन चोपडा येथे सैराटची पुनरावृत्ती झाल्याची माहिती पोलिसांच्या तपासात समोर येत आहे. या घटनेमुळे लगीन घरात घुमणाऱ्या सनईच्या सूरांचा आक्रोशात रुपांतरण झाल्याने वाघ कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
चोपडा येथे नणंदची हळद असल्याने वाघ कुटुंबिय हळदीच्या कार्यक्रमात नाचत होते. यावेळी मुलीने प्रेमविवाह केल्याच्या रागातून सीआरपीएफमधील सेवानिवृत्त अधिकारी किरण मंगले यांनी त्यांच्याजवळी पिस्तुलीतून मुलगी तृत्पी व जावाई अविनाश वाघ यांच्यावर गोळ्या झाडल्या. यामध्ये तृप्ती अविनाश वाघ (वय २४) हीचा जागीच मृत्यू झाला तर अविनाश वाघ (वय २८, रा. कोथरुड, पुणे) हे गंभीर जखमी झाले होते. त्यांना उपचारासाठी पुणे येथे हलविण्यात आले असून त्याठिकाणी उपचार सुरु आहेत. याप्रकरणी अविनाशची आई प्रियंका ईश्वर वाघ यांच्या फिर्यादीवरून किरण मंगले व मुलगा निखिल किरण मंगले (दोघे रा. जिधुळे ता. शिरपूर, जि. धुळे) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास शहर पोलिस निरीक्षक मधुकर साळवे हे करीत आहेत.
साध्या पद्धतीने पार पडला विवाहसोहळा
गोळीबाराच्या घटनेमुळे आनंदाचे वातावरण असलेल्या लगीन घरात सनाईच्या सूरांचे रुपांतर काही क्षणाच आक्रोश आणि किंचाळ्यांमध्ये झाले. त्यामुळे तृप्ती हीच्या नणंदेचे विवाह सोमवारी सकाळी दहा वाजेच्या सुमारास अंबेडकर नगरात अत्यंत साध्या पद्धतीने पार पडला. ऑनरकिलींगच्या या घटनेमुळे लग्नासाठी सजलेल्या मंडपात प्रचंड शांतता पसरलेली होती.
रुग्णालयातून निघाली अंत्ययात्रा
मयत तृप्तीच्या नणंदेच्या विवाहासाठी वाघ कुटुंबिय चोपडा येथे आले होते. परंतू याठिकाणी वडिलांकडून तीला ठार मारल्याची घटना समाजमन सुन्न करणारी आहे. सोमवारी सकाळी चोपडा उपजिल्हा रुग्णालयात तृप्तीच्या मृतदेहाचे शवविच्छेदन केल्यानंतर मृतदेह थेट रुग्णालयातून स्मशानभूमीत आणण्यात आला. याठिकाणी अत्यंत शोकाकुल आणि पोलिस बंदोस्तात तृप्तीवर अंत्यसंस्कार करण्यात आले.