औरंगाबाद (वृत्तसंस्था) भलामोठा दगड डोक्यात घालून तरुणाचा निर्घृण खून केल्याची घटना औरंगाबाद शहरातील टीव्ही सेंटर भागात असलेल्या मैदानात घडली आहे. एवढेच नाहीतर तरुणाचे गुप्तांग जाळल्याचंही उघड झालं असून या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे.
शहरातील टी व्ही सेंटर चौकातील ग्राउंडवर तरुणाचा मृतदेह आढळून आल्याची माहिती मिळताच पोलीस पथक घटनास्थळी दाखल झाले. मृतक तरुणाचे नाव सिद्धार्थ साळवे असल्याची माहिती समोर आली आहे. त्याचे वय सुमारे ३२ वर्षे असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. या तरुणाची दगडाने ठेचून हत्या करण्यात आली असून त्याचे गुप्तांगही आरोपींनी जाळले आहे. आरोपी एक पेक्षा अधिक असण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृतक तरुणाची ओळख पटली आहे. या तरुणाची हत्या होऊन २४ तासांपेक्षाही अधिक काळ झाला असावा असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे. तसेच दारू पिण्यावरुन वाद झाल्यानंतर ही हत्या केली असावी असा अंदाजही पोलिसांनी वर्तवला आहे. मृतक तरुणाचा मृतदेह पोलिसांनी शवविच्छेदनासाठी पाठवला आहे. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सुरू आहे.
















