पाटणा (वृत्तसंस्था) महिलेचे अपहरण आणि हत्या (Kidnap and Murder) केल्याच्या आरोपाखाली पतीने तीन महिन्यांची शिक्षाही भोगली आणि नऊ वर्षांपासून बेपत्ता (Missing Lady) असलेली विवाहिता अचानक तिच्या सासरच्या मंडळींना बाजारात भेटल्याने खळबळ उडाली. पोलिसांनी महिलेला ताब्यात घेतले आहे. बिहारमधील गया शहरात (Bihar Crime) हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.
गयामधील मुफस्सिल पोलीस ठाण्याअंतर्गत अबगिलामध्ये ही घटना घडली. ज्या महिलेच्या अपहरण आणि हत्या प्रकरणात पतीने तुरुंगवास भोगला होता, ती बाजारात फिरताना सापडली. पती विजय कुमारच्या दाव्यानुसार पत्नी उषा कुमारी नऊ वर्षांपूर्वी अचानक कुठेतरी निघून गेली होती. त्याआधीही ती अनेक वेळा घरातून पळून गेली होती. मात्र बहुतांश वेळा ती पाटण्यातील मीठापूर येथे असलेल्या माहेरी जायची. एकदा गेलेली पत्नी परत आलीच नव्हती. खूप शोधाशोध केल्यानंतरही कुठलेच पुरावे सापडले नव्हते. त्यामुळे उषाच्या माहेरच्या मंडळींनी तिचा पती विजय कुमार, दीर रणजीत कुमार आणि सासूच्या विरोधात अपहरण आणि हत्येचा गुन्हा दाखल केला. 2013 मध्ये घडलेल्या या प्रकारानंतर पोलिसांनी आरोपी पती विजय कुमारला तुरुंगातही धाडलं होतं. तीन महिने शिक्षा भोगल्यानंतर तो परत आला होता.
पती विजय मिस्त्री म्हणून काम करतो. पोलिसांनी तपासाअखेर त्याचं नाव केसमधून वगळलं. तर सासूला हायकोर्टातून जामीन घ्यावा लागला होता. मात्र हे प्रकरण अजूनही कोर्टात सुरु आहे. दीर रणजीतने सांगितलं, की आमची बहीण एके संध्याकाळी दूध आणायला बाजारात गेली होती. तेव्हा नऊ वर्षांपूर्वी बेपत्ता झालेल्या वहिनीला पाहून ती चकित झाली. तिने घरी येऊन आम्हाला सांगितलं. त्यामुळे विजय आणि कुटुंबीय उषाच्या माहेरी गेले. मात्र तिने दुसरं लग्न करणार असल्याचं सांगत सासरी येण्यास नकार दिला. त्यामुळे विजयने या प्रकरणाची माहिती पोलिसांना दिली असता उषाला ताब्यात घेण्यात आलं. एखादी महिला सात वर्ष सापडली नाही, तर तिला मृत समजले जाते. संबंधित महिला नऊ वर्षांनी परतल्याने तत्कालीन साक्षींच्या आधारे पुढील कारवाई केली जाईल. खोटी केस करणाऱ्या महिलेच्या माहेरच्या माणसांवरही कारवाई होईल, असं पोलिसांनी सांगितलं.