पाळधी ता. धरणगाव (प्रतिनिधी) शहरापासून जवळच असलेल्या पाळधी येथील तरुणीचा गावातीलच तरुणाशी प्रेमविवाह झाला. दोन दिवसांपूर्वीच पतीसह सासरी गेलेल्या या तरुणीचा थर्टीफर्स्टच्या रात्री संशयास्पद मृत्यू झाला. आता विष प्राशन केलेल्या तिच्या पतीचाही मृत्यू झाला आहे.
याबाबत वृत्त असे की, जळगाव जिल्ह्यातील धरणगाव तालुक्यात पाळधी येथील २९ डिसेंबर रोजी आरती पाळधी गावातीलच प्रशांत विजयसिंग पाटील या तरूणासोबत विवाह करून परतली. पाळधी येथील प्रशांत विजयसिंग पाटील या तरूणाचे गावातील आरती विजय भोसले हिच्याशी प्रेम होते. यातून त्यांनी पळून जाऊन विवाह केला होता. काही दिवसांपूर्वीच ते घरी परतले होते. यानंतर अचानक काल सकाळी आरतीचा संशयास्पद मृत्यू झाला होता. तिचा मृतदेह अर्धनग्नावस्थेत सापडला होता. तर मागील खोलीत तिचा पती प्रशांत हा देखील बेशुध्दावस्थेत आढळून आला होता.
जिल्हा रूग्णालयात सकाळी मृतदेह आणल्यानंतर पती, त्याचे वडील व त्याच्या मित्रांनीच आरतीचा घातपात केल्याचा आरोप माहेरच्यांनी केला. त्यानंतर मृतदेह स्वीकारण्यास नकार दिला होता. अखेर या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिल्यानंतर तिचे पार्थिव स्वीकारून सायंकाळी उशीरा अंत्यसंस्कार करण्यात आले होते.
दरम्यान, मयत तरूणीच्या पतीला रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचार सुरू असतांनाच तिचा पती प्रशांत विजयसिंग पाटील याने आज सकाळी शेवटचा श्वास घेतला. त्याचा मृत्यू विषबाधेनेच झाल्याचे प्रथमदर्शनी दिसून आले आहे. मात्र तरूणीच्या पाठोपाठ तिच्या पतीचाही मृत्यू झाल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.