कोलकाता (वृत्तसंस्था) अभिनेते मिथून चक्रवर्ती यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या व्यासपीठावर भाजपात प्रवेश केला. यावेळी बोलताना मिथून चक्रवर्ती म्हणाले, “मी कोब्रा आहे. कुणी जर हिसकावून घेत असेल, तर मी उभा राहिल. माझा एक दंश पुरेसा आहे. असा इशाराच मिथुन चक्रवर्ती यांनी दिला.
मागील काही दिवसांपासून मिथून चक्रवर्ती हे पुन्हा राजकारणात दाखल होणार असल्याची चर्चा सुरू होती. सरसंघचालक मोहन भागवत यांनी मुंबईत मिथून चक्रवर्ती यांची भेट घेतल्यानंतर या चर्चेला बळ मिळालं होतं. भाजपात दाखल होणार असल्याचं बोललं जात असतानाच आज मिथून चक्रवर्ती यांनी कमळ हाती घेतलं. मिथून चक्रवर्ती यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा आयोजित करण्यात आलेल्या कोलकातातील ब्रिगेड मैदानातील व्यासपीठावर भाजपात प्रवेश केला. यावेळी बोलताना मिथून चक्रवर्ती म्हणाले, “मी कोब्रा आहे. कुणी जर हिसकावून घेत असेल, तर मी उभा राहिल. माझा एक दंश पुरेसा आहे. मी बंगाली आहे आणि जो कुणी इथे वाढला आहे, त्याचा भूमीवर अधिकार आहे. मी ग्वाही देतो की, पश्चिम बंगालमध्ये राहणाऱ्या प्रत्येक माणसाच्या हक्कासाठी मी लढेल,” असं मिथून चक्रवर्ती म्हणाले.
बंगालमध्ये राहणारे सर्वचजण बंगाली
थोडे शांत व्हा. मला बोलू द्या. मी जोडाबगान ठाणे रहिवासी आहे. त्यामुळे या परिसरात पोस्टमनही गोंधळून जायचा. त्यावेळी आयुष्यात काही तरी करण्याचं स्वप्न पाहिलं होतं. आता हे स्वप्न पूर्ण होईल, असं वाटतंय. स्वप्न केवळ पाहण्यासाठी नसतं तर ते पूर्ण करण्यासाठी असतं. मी बंगाली आहे. त्याचा मला अभिमान आहे. बंगालमध्ये राहणारे सर्वचजण माझ्यासाठी बंगाली आहेत. त्यामुळे प्रत्येक गोष्टीवर तुमचा हक्क आहे. तुमचा हा अधिकार कोणी हिसकावून घेण्याचा प्रयत्न केल्यास आम्ही तुमच्यासाठी उभे राहू, असं मिथुन म्हणाले.
स्वप्न पूर्ण होतंय
“मी मूळचा उत्तर कोलकातातील जोराबागन या एका छोट्या परिसरातला आहे. माझं एक स्वप्न होतं की, खूप मोठं व्हावं. पण ते पूर्ण होऊ शकलं नाही. मी याचीही कधी कल्पना केली नव्हती की, पंतप्रधान नरेंद्र मोदींसह देशातील सर्वात मोठ्या नेत्यासोबत व्यासपीठावर बसण्याची संधी मिळेल,” असं मिथून यांनी सांगितलं.