पुणे (वृत्तसंस्था) अयोध्या दौऱ्याला विरोध असतानाही मी तिकडे गेलो असतो आणि काही झाले असते तर मनसैनिकही तिकडे भिडले असते. त्यानंतर त्यांना केसेसमध्ये अडकवण्याचा ट्रॅप होता. मी माझे मनसैनिक असे हकनाक अडकू देणार नाही. तसेच ज्यांना ज्यांना माझी अयोध्या वारी खुपली होती असे अनेक जण होते. त्या सर्वांनी मिळून हा ट्रॅप आखला असं राज ठाकरेंनी जाहीर सभेत सांगितलं.
राज ठाकरे पुढे म्हणाले की, मी एकाच गोष्टीचा विचार केला. अयोध्येला जाणार हा विचार मनात होतो. राम जन्मभूमीचं दर्शन घेणं आलं. मी हट्टाने गेलो असतो. महाराष्ट्रातील सैनिक हिंदू बांधव आले असते. तिथे जर काही झालं असतं. आपली पोरं तर गेली असती अंगावर, तुमच्यावर केसेस टाकल्या गेल्या असत्या. तुम्हाला तुरुंगात सडवलं गेलं असतं. हकनाक कारण नसताना केसेसचा ससेमिरा लावला असता. मी बाळा नांदगावकर आणि सरदेसाईंना सांगितलं आपल्या पोरांना हकनाक घालवणार नाही. सर्व प्रमुख पदाधिकाऱ्यांवर केसेस टाकल्या असत्या. ऐन निवडणुकीच्यावेळी हे झालं असतं. तेव्हा इथे कोणीच नसतं हा सर्व ट्रॅप होता.
एक खासदार उठतो आणि मुख्यमंत्र्यांना आव्हान देतो. शक्य आहे का ? या गोष्टींना अनेक पापुद्रे आहेत. काही तर तुम्हाला सांगता येणार नाही. मी माफी मागावी याची मागणी केली, यांना आता 12-14 वर्षांनंतर जाग आली. यातून चुकीचे पायंडे पडत आहेत. विषय माफी मागण्याचाच आहे ना मग गुजरातमध्ये अल्पेश ठाकूर नावाच्या नेत्यांनं यूपी,बिहारच्या लोकांना हाकलून दिलं. ती लोकं मुंबईत आले, इथं आओ जाओ घर तुम्हारा. तिथं गुजरातमध्ये कोण माफी मागणार, असं राज ठाकरे म्हणाले. हे राजकारण समजून घेणं गरजेचं आहे. यांना आपलं हिंदूत्व झोंबलं, लाऊडस्पिकर झोंबले, असं राज ठाकरे म्हणाले.
गुजरातमध्ये अल्पेश ठाकूर म्हणून गृहस्थ आहेत. तिथं उत्तर प्रदेश आणि बिहारच्या लोकांपैकी एकानं बलात्कार केला. यानंतर उत्तर प्रदेश आणि बिहारच्या लोकांना बाहेर काढण्यात आलं. त्यानंतर ते मध्यप्रदेशमध्ये गेले त्यानंतर तिथं त्यांना मारहाण करण्यात आली. यानंतर ते महाराष्ट्रात आले, असं राज ठाकरे म्हणाले. जर मशिदीवर बांग जोरात लागली तर हनुमान चालिसा जोरात लावा, असं मी सांगितलं. राणा दाम्पत्य उठलं आणि मातोश्रीवर हनुमान चालिसा म्हणणार असं सांगितलं, त्यानंतर त्यांना अटक झाली. मधू इथे आणि चंद्र तिथे, असं झालं. त्यानंतर त्यांना सोडण्यात आलं. शिवसैनिक आक्रमक झाले. लडाखमध्ये संजय राऊत आणि राणा दाम्पत्य जेवतानाचे फोटो समोर आली. यांचं हिंदुत्त्व ढोंगी आहे, असं राज ठाकरे म्हणाले.
भाषणाच्या सुरुवातीला राज यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचे नाव घेता टोला लगावला. निवडणुका नाही तर उगाच भिजून का भाषण करायचं? सध्या पावसाचा इशारा देण्यात आला आहे. म्हणून नदी पात्रातील सभा रद्द केली. यावेळी उपस्थित कार्यकर्ते म्हणाले, आवाज… आवाज. यावर राज म्हणाले, आवाज ! हळूहळू येईल. मी अयोध्या दौरा रद्द केला आहे. त्याचे कारण मी आधीच सांगितले आहे. माझ्या पायावर शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे. पायाचे दुखणे वाढले आहे. त्यामुळे मी माझा अयोध्या दौरा स्थगित केला,असे राज यांनी सांगितले.
राणा दाम्पत्यावर बोलताना राज ठाकरे म्हणाले की, ते मातोश्रीवर हनुमान चालिसा म्हणायला जाणार होते. मातोश्री काय मशीद आहे काय? असा सवाल त्यांनी केला. मोठा गोंधळ, आरोप प्रत्यारोप झाले. एवढा गोंधळ होऊन संजय राऊत आणि राणा दाम्पत्य लडाखमध्ये एकत्र जेवताना दिसले. हे सगळे ढोंगी आहेत, असं राज ठाकरे म्हणाले.