नांदेड, ता.धरणगाव (प्रतिनिधी) गावानजीकच्या तापी नदीच्या पात्रातून गेल्या महिन्याभरापासून रात्रीच्या वेळेस वाळूची मोठ्या प्रमाणात अवैध वाहतूक सुरू आहे. दरम्यान, वाळूचोरीकडे विभागाचे साफ दुर्लक्ष होत असल्याचे बोलले जात आहे.
तापीपात्रातील वाळू गटाचा लिलाव करण्याचा ग्रामसभेने ठराव केलेला असून, प्रत्यक्षात लिलाव अजून झालेला नाही. या संधीचा फायदा घेऊन रात्रीच्या वेळी ट्रॅक्टरांद्वारे महसूल प्रशासनाच्या नाकावर टिच्चून अवैध चोरटी वाहतूक सर्रासपणे सुरू आहे. परिणामी नदीपात्र दिवसेंदिवस मोठ्या प्रमाणावर पोखरले जात आहे. तलाठ्यांनी वेळीवेळी नदीपात्रालगतचे चोर रस्ते जेसीबी यंत्रणेच्या साहाय्याने बंद करून, वाळूचोरीला आळा घालण्याचा प्रयत्न केला. मात्र, चोरटे दुसरा मार्ग शोधतात. प्रशासनाने वाळूचोरीस आळा घालण्यासाठी या भागात फिरत्या भरारी पथकाची नियुक्ती करणे गरजेचे असल्याची मागणी होत आहे.