जळगाव (प्रतिनिधी) धरणगाव तालुक्यातील नांदेड या गावात शासनाने मुस्लिम बिरादरीला 20 आर जमीन स्मशानभूमीसाठी दिली असून त्यावर मुस्लिम समाजातील दफन विधी होत असतो. मागील काही दिवसापासून या स्मशानभूमी मधूनच अवैध स्वरूपाची वाळू वाहतूक होत असल्यामुळे कबरींची विटंबना होत आहे. ज्यामुळे दोन समाजात तेढ निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. या गोष्टीला प्रशासनाने त्वरित आळा घालावा. अन्यथा कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास त्यास वाळू वाहतूकदार ठेकदार व वाळू माफिया जबाबदार राहील, अशा स्वरूपाची तक्रार वजा निवेदन जळगाव जिल्हा मुस्लिम मन्यार बिरादरीचे अध्यक्ष फारुख शेख यांच्या नेतृत्वात नांदेड येथील रहिवाशांनी जिल्हाधिकारी जळगाव यांना आज दिले आहे.
…तरी देखील वाळू माफिया सुसाटच !
या तक्रारी व निवेदनाची प्रत पोलीस अधीक्षक जळगाव, उपविभागीय पोलीस अधिकारी व उपविभागीय दंडाधिकारी चोपडा तसेच पोलीस निरीक्षक धरणगाव यांना दिले असून हेच निवेदन वजा तक्रार एफआयआर म्हणून नोंदविण्यात यावी, अशी विनंती पोलीस निरीक्षक धरणगाव यांना केलेली आहे. दरम्यान, एकीकडे निवेदन दिले जात आहे. माध्यामांमध्ये बातम्या प्रकाशित होत आहेत. महसूल विभागाकडून घटनास्थळी पंचनामा करतोय, तरी देखील वाळू माफिया सुसाटच असल्याचे चित्र आहे. थोडक्यात माफिया कुणालाही जुमानत नसल्याचा आरोप ग्रामस्थ करीत आहेत.
निवासी उपजिल्हाधिकारी यांनी दिले कारवाईचे आश्वासन
शिष्टमंडळाने निवासी उपजिल्हाधिकारी सोपान कासार यांची भेट घेऊन त्यांना तक्रार वजा निवेदन सादर केले. या निवेदान्द्वारे मागणी केली की, नांदेड गावातून अवैध रूपाने होत असलेली वाळू वाहतूकीमुळे कब्रस्तानमधील कबरींची विटंबना व धार्मिक द्वेष निर्माण होत असल्याने त्यांच्यावर त्वरित कारवाई करण्यात यावी. त्यावर श्री. कासार यांनी संबंधितांवर त्वरित योग्य ती कारवाई करण्यात येईल, असे आश्वासन मणियार बिरादरीच्या शिष्टमंडळाला दिले.
शिष्टमंडळात यांचा होता समावेश
मुस्लिम मणियार बिरादरीचे अध्यक्ष फारुक शेख, उपाध्यक्ष सय्यद चांद, संचालक अख्तर शेख, शिकलगल बीरादरीचे मुजाहिद खान, साहिल पटेल, आबीद खान सह नांदेड येथील मन्यार बिरादरीचे अजीम मणियार, शकील मणियार, सलमान मणियार, शेख शामद मणियार, नवीद मन्यार , जमील मण्यार, अकील मन्यार ,पटेल बिरादरीचे अनिस पटेल, खाटीक बिरादरीचे कलीम खाटीक, पिंजारी बिरादरीचे बशीर पिंजारी, शाह बिरादरीचे नुमान शाह व जनरल बिरादरीचे फक्रुद्दीन शेख यांचा समावेश होता.
धरणगाव महसूल विभागाकडून घटनास्थळी पंचनामा !
वाळू माफिया थेट स्मशानभूमीतूनच अवैधरित्या वाहतूक करीत असल्याचे वृत्त प्रकाशित झाल्यानंतर धरणगाव तहसीलचे नायव तहसीलदार संदीप मोरे यांनी घटनास्थळी जात पाहणी केली. शासकीय दस्तऐवज प्रमाणे संबंधित जागा मणियार बिरादरीची असल्याची खात्री केली. तसेच स्मशानभूमीची हद्द किती आहे?, यासाठी मोजणी करून घेण्याचे सांगितले. यावेळी मणियार बिरादरीच्या काही जणांचे जाब जबाब घेत घटनास्थळी पंचनामा केल्याची माहिती देखील श्री. मोरे यांनी दिली.