मुंबई (वृत्तसंस्था) मुंबई पोलिसांकडून शहरात ८ एप्रिलपर्यंत जमावबंदीचा आदेश (Section 144) लागू करण्यात आला आहे. त्यामुळे या काळात मुंबईत पाच किंवा त्यापेक्षा अधिक व्यक्तींना एकत्र जमता येणार नाही. याशिवाय, मोर्चा, मिरवणूक, वरात आणि सार्वजनिक ठिकाणी फटाके फोडण्यावरही मुंबई पोलिसांकडून बंदी घालण्यात आली आहे.
मुंबईत ८ एप्रिलपर्यंत जमावबंदी लागू केली असली तरी त्यामागे नेमके कारण काय आहे ? असा प्रश्न विचारला जातोय. तर दुसरीकडे मुंबई पोलिसांनी शांतता व सुव्यवस्था राखण्यासाठीच हा निर्णय घेण्यात आला असल्याचे सांगितले आहे. तसेच नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल असेदेखील मुंबई पोलिसांनी म्हटलंय. “बृहन्मुंबई हद्दीत शांतता व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी ८ एप्रिलपर्यंत जमावबंदी आदेश जारी केला आहे. यानुसार ५ किंवा त्यापेक्षा अधिक व्यक्तींचा जमाव करण्यास मनाई असेल. मोर्चा काढणे, जमाव करुन ध्वनीवर्धकाचा, संगीतीय बँड, फटाके फोडण्यास प्रतिबंध असेल,” असे पोलीस उपायुक्तांनी सांगितले.
तसेच बृहन्मुंबई पोलीस आयुक्तालय क्षेत्रात ८ एप्रिलपर्यंत ड्रोन, पॅराग्लायडर्स, रिमोट कंट्रोलवर चालणारे मायक्रो लाईट एअरक्राफ्ट, एरिएल मिसाईल आदी उपकरणीय वापरांवर बंदी घालण्यात घालण्यात आली आहे. तसा आदेश पोलीस उपआयुक्तांनी जारी केला आहे.
















