मुंबई (वृत्तसंस्था) कोरोनाची लाट आता हळूहळू ओसरत आहे. त्यामुळे आता महाविकास आघाडी सरकारने क्रीडापटूंसाठी महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. सरकारने विविध खेळाच्या प्रशिक्षणासाठी आता परवानगी दिली आहे. तसंच स्पर्धा देखील आयोजित करण्यास हिरवा कंदील दिला आहे.
कोरोना व्हायरसचा वाढता संसर्ग पाहता त्या पार्श्वभूमीवर लागू करण्यात आलेल्या अनेक निर्बंधांचा फटका क्रीडा क्षेत्रालाही बसल्याचं पाहायला मिळालं होतं. क्रिकेटच्या मैदानांपासून कुस्तीच्या आखाड्यापर्यंत याचे पडसाद उमटले होते. पण, अखेर खेळाडूंना मोठा दिलासा देत महाराष्ट्र राज्य शासनानं क्रीडा क्षेत्राच्या दृष्टीनं अत्यंत महत्त्वाचा निर्णय़ घेतला आहे. आर्चरी, सायकलिंग, तलवारबाजी, शुटिंग तसंच मध्यम संपर्क येणारे खेळ क्रिकेट, फुटबॉल, हॉकी आणि बास्केटबॉल या खेळांना सराव करण्यासाठी परवानगी देण्यात आली आहे. यामुळे राज्यातील वेगवेगळी मैदानं तसंच प्रशिक्षण केंद्र आता सुरू करता येणार आहेत. सर्व प्रशिक्षण ठिकाणी १० ते १५ खेळाडू नेमून दिलेल्या वेळेत सुरक्षित अंतर एसपी लक्षात घेत वेगवेगळ्या वेळांमध्ये सराव करता येईल. खेळाडूंसाठी किंवा त्यांचे पालक यांच्यामध्ये जर कोविडची लक्षणं आढळल्यास सरावाच्या ठिकाणी मनाई असणार आहे. त्याचबरोबर कंटेनमेंट झोनमध्ये सुद्धा परवानगी नाकारण्यात आली आहे. प्रशिक्षण असेल अथवा कोणतीही स्पर्धा आयोजित केली असेल तर सर्व खेळाडू व प्रशिक्षक यांच्या देखील कोविडच्या चाचण्या केल्या जातील, असं निर्देशही सरकारने दिले आहे. कोरोनाची लाट जरी ओसरली असली तरीही योग्य ती सर्व खबरदारी देखील घेणे गरजेचं असल्याचं राज्य सरकारने आपल्या पत्रकामध्ये म्हटलं आहे.
सरावाच्या ठिकाणी १० ते १५ खेळाडूंनी नेमून दिलेल्या जागेत सराव करणं अपेक्षित असणार आहे. तर, १४ वर्षांखालील खेळाडूंसाठी सरावाच्या वेगळ्या वेळा आखण्यात येतील. याशिवाय खेळाडू किंवा पालक यांपैकी कोणालाही कोविडची लक्षणं दिसल्यास त्यांना सरावाच्या ठिकाणी येण्यास सक्त मनाई असेल.
















