मुंबई (वृत्तसंस्था) कोरोनाची दुसरी लाट राज्यात झपाट्याने वाढत असल्यामुळे त्यापुढे आरोग्य यंत्रणा अपुरी पडत असून परिणामी उपचाराअभावी अनेक कोरोना रुग्णांचा मृत्यू होत आहे. आता याच गोष्टीची दखल मुंबई उच्च न्यायालयाने घेतली आहे. स्मशानभूमीत अंत्यसंस्कारासाठी जागा उपलब्ध होईपर्यंत मृतदेह ताब्यात देऊ नये, अशी सूचना उच्च न्यायालयाने दिली आहे.
सध्या मृत्यूमुखी पडणाऱ्यांच्या तुलनेत उपलब्ध व्यवस्था पुरेशी नाही. राज्यभरातील अंत्यसंस्काराच्या ठिकाणांची स्थिती सुधारण्यासाठी उपाययोजना करण्याचे जिल्हा प्रशासनाला हायकोर्टाने निर्देश दिले आहेत. त्याचबरोबर राज्यभरातील शवागृहांची स्थितीही सुधारण्यासाठी उपाययोजना करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. कोरोना काळातील समस्यांबाबत हायकोर्टात दाखल याचिकेवर सुनावणी दरम्यान मुंबई उच्च न्यायालयाने या सूचना दिल्या आहेत.
अहमदनगरमधील खासदारांनी रेमडेसिवीरची १ हजार इंजेक्शन कशी काय मिळवली? असा सवालही हायकोर्टाने विचारला. दिल्लीतून चार्टड विमानानं ती मुंबईत कशी काय आणली?, दिल्लीतही सध्या कोरोनाची अवस्था गंभीरच आहे. जर भविष्यात पुन्हा असे प्रकार घडले तर औषध उत्पादन कंपन्यांच्या थेट वितरणावर बंदी आणण्याचे आदेश जारी करू, असा गर्भित इशारा हायकोर्टाने दिलाय.
दरम्यान, पुण्यातील दररोज वाढत चाललेल्या कोरोना रुग्णांच्या मृत्यूंमुळे अंत्यसंस्कार करण्यासाठी कित्येक तास थांबावे लागत आहे. अनेकदा तर दुसरा दिवस उजाडत असून इथली स्मशानभूमी चोवीस तास चालू आहे.