औरंगाबाद (वृत्तसंस्था) लहान मुलांनी बटण, गोट्या, खिळा, पिना अशा वस्तू गिळल्याच्या घटना आतापर्यंत समोर आल्या आहेत. मात्र औरंगाबादमध्ये राहणाऱ्या एका व्यक्तीने गिळलेली वस्तू ऐकून कोणीही चकित होईल. औरंगाबादमध्ये राहणाऱ्या ३३ वर्षीय व्यक्तीने थेट टूथब्रश गिळल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.
टूथब्रश पोटात गेल्याने त्या व्यक्तीला वेदना सुरू झाल्या. सदर व्यक्तीला उपचारासाठी औरंगाबाद येथील शासकीय घाटी रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं. तपासणीसाठी डॉक्टरांनी सिटीस्कॅन केलं तर चक्क व्यक्तीच्या पोटात लांबलचक टूथब्रश पाहायला मिळाला. पोटात चक्क टूथब्रश पाहूनडॉक्टरही चक्रावून गेले. तब्बल तास-दीड तासांची गुंतागुंतीची शस्त्रक्रिया करून डॉक्टरांनी हा टूथब्रश काढला. ही घटना २६ डिसेंबरची आहे औरंगाबाद शहरातील एका व्यक्तीने सकाळी दात घासताना त्याने टूथब्रशच गिळला. पोट दुखू लागल्याने सदर व्यक्ती सकाळी ११ वाजता घाटी रुग्णालयात दाखल झाला. रुग्णाची अवस्था पाहून तत्काळ उपचार सुरु झाले. उपचारासाठी रुग्णाचा सीटी स्कॅन काढण्यात आला. तेव्हा रुग्णाच्या पोटात टूथब्रश दिसला. हा प्रकार पाहून डॉक्टरांनाही धक्का बसला. हा ब्रश कसा गिळला असेल, असा प्रश्न त्यांनाही पडला. पोटदुखीच्या असाह्य वेदना सुरू असलेल्या या रुग्णाला वेदनेतून मुक्ती देण्यासाठी डॉक्टरांनी तातडीने शस्त्रक्रिया करून हा ब्रश पोटातून काढला. सदर रुग्णांवर कक्ष क्रमांक १८ मध्ये उपचार सुरू असून, आता त्याची प्रकृती उत्तम आहे. मात्र ही घटना आश्चर्यकारक यासाठी आहे लहान बाळाने नव्हे तर चक्क ३३ वर्षाच्या व्यक्तीनं हा ब्रश गिळला होता.
सर्जरीमध्ये ३३ वर्षीय तरुणाच्या पोटातून टूथब्रश बाहेर काढण्यात आला. हे पाहून डॉक्टरही अवाक झाले. तरुणाने गिळलेला टूथब्रश हा थोडाथोडका नव्हे, तर तब्बल अर्धा फूट लांबीचा होता. इतक्या लांबीचा टूथब्रश तरुणाने का आणि कसा गिळला, हा प्रश्न डॉक्टरांनाही पडला आहे. सर्जरीनंतर या रुग्णांची प्रकृती व्यवस्थित आहे.