औरंगाबाद (वृत्तसंस्था) औरंगाबाद जिल्ह्यातील एका कोव्हिड सेंटरमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. औरंगाबादमध्ये महापालिकेच्या कोरोना उपचार केंद्रात डॉक्टरनं कोरोना पॉझिटिव्ह महिला रुग्णाकडे शरीर सुखाची मागणी केल्याचा आरोप करण्यात आला आहे. या प्रकारानंतर रुग्णांच्या संतप्त नातेवाईकांनी रूग्णालयात घुसून डॉक्टरला बेदम मारहाण केली आहे.
पदमपुरा येथील कोरोना उपचार केंद्रात दोन दिवसांपूर्वी एक महिला रुग्ण दाखल झाली. या महिलेचा मोबाईल नंबर घेऊन एक आयुष डॉक्टर तिला सतत फोन करीत होता. मंगळवारी रात्री दोन वाजता डॉक्टरने या महिलेकडून शरीर सुखाची मागणी केली. तिला गच्चीवर नेण्याचा प्रयत्न केला. महिलेने त्याला विरोध करत आरडाओरड केली. त्यामुळे कोविड केअर सेंटरमध्ये एकच गोंधळ उडाला. इतर कर्मचाऱ्यांनी धाव घेऊन मध्यस्थी केली. पीडित महिला रुग्णालयात रडत होती. घटनेची माहिती नातेवाईकांना मिळाली.नातेवाईकांनी रुग्णालयात शिरून त्या डॉक्टरला बेदम मारहाण केली.बुधवारी झालेला प्रकार प्रशासक आस्तिककुमार पांडेय यांना कळला. त्यांनी तातडीने या प्रकरणाची चौकशी करून अहवाल गुरुवारी सकाळपर्यंत चौकशी करून अहवाल सादर करावा, असे आदेश दिले. दरम्यान या पीडित महिलेने बदनामीपोटी पोलिसात तक्रार दिली नाही. महानगरपालिकेकडून डॉक्टरची हकालपट्टी केल्याची माहिती औरंगाबाद महानगरपालिकेच्या आरोग्य अधिकारी नीता पाटणकर यांनी दिली आहे.