चाळीसगाव (प्रतिनिधी) किराणा दुकानावर येऊन ते काय आहे, मला दाखवा म्हणत वृद्ध महिलेच्या गळ्यातील सोन्याची चैन लांबवल्याची खळबळजनक घटना दि. १४ फेब्रुवारी रोजी सहा वाजेच्या सुमारास घडली.
या संदर्भात अधिक असे की, गं. भा. कमलाबाई शंकरलाल खत्ती (वय ७० रा. दत्तवाडी चाळीसगाव) या दि. १४ फेब्रुवारी रोजी पावणे सहा वाजेच्या सुमारास आपल्या किराणा दुकानात होत्या. त्याचवेळी दोन अनोळखी तरुण आले. यातील एक जण पल्सरवर दुकानाच्या बाहेरच उभा होता. तर दुसरा एक गोरा रंगाचा चेहरा गोल व चपटा, मध्यम उंचीचा, मध्यम बांधा आणि डोक्यावर लांब केस असलेला, अंदाजे २५ ते ३० वर्ष वयाचा, काळ्या रंगाचे कपडे घातलेला तरुण दुकानात आला. त्याने गं. भा. कमलाबाई यांना कपाटाकडे हात दाखवुन ते काय आहे मला दाखवा? असे मराठी बोलला. गं. भा. कमलाबाई यांनी मागे वळून पाहण्यासाठी मान फिरवताच त्याने फिर्यादीच्या गळ्यातील ३० हजार रुपये किंमतीची १२ ग्रॅम वजनाची सोन्याची चैन बळजबरीने हिसकावून पळ काढलं. यावेळी दुकानासमोर उभ्या असलेल्या पल्सर मोटारसायकलवर दोघं चोरटे फरार झालेत. याप्रकरणी दोघं अज्ञात चोरट्यांविरुद्ध जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पो.नि के. के. पाटील हे करीत आहेत.