धरणगाव (प्रतिनिधी) शहरातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याजवळ कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या स्वागताच्या वेळी झालेल्या गर्दीचा फायदा घेत चोरट्यांनी अनेकांचे मोबाईल आणि पैसे लंपास केले. यावेळी काही नागरिकांनी दोन संशयितांना पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले. याप्रकरणी रात्री उशिरा धरणगाव पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या संदर्भात अधिक असे की, कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हे शनिवारी जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते. धरणगावात पक्ष कार्यालय उद्घाटनसाठी त्यांचे रात्री ९ वाजेच्या सुमारास आगमन झाले. यावेळी स्वागताच्या वेळी झालेल्या गर्दीचा फायदा घेत तीन चोरट्यांनी अनेकांच्या खिशातील मोबाईल आणि पाकीट मारायला सुरुवात केली. त्यात मुक्तगीर गुलाम मोहम्मद देशमुख यांचा १५ हजार रुपये किंमतीचा मोबाईल आणि १५ हजार रोख, गंगाराम शंकर साळुंखे (रा. पाळधी वाडा) यांच्या खिशातील १० हजार रुपये रोख, गोपाल नथ्थू बाविस्कर (रा. चिंतामण मोरया) यांचा ८ हजार रुपये किंमतीचा मोबाईल तसेच २ हजार रुपये, तीन एटीएम तर डी.जी.पाटील यांच्या खिशातील ५ हजार रुपये रोख आणि एटीएम कार्ड चोरीला गेले.
गर्दीमध्ये तीन तरुणांचे वागणे संशयास्पद वाटल्यामुळे आबा वाघ व अन्य नागरिकांनी दोन तरुणांना पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले. पोलीस स्थानकात नेल्यावर त्यांनी त्यांची ओळख अरबाज सलीम शहा फकीर (वय १८, रा. रामदेवजी बाबा नगर, धुळे) आणि अरबाज सलीम शहा फकीर (रा. हुडको, शिरपूर जि. धुळे), अशी समोर आली. तर यांच्यासोबत असलेला तिसरा तरुण मात्र, गर्दीचा फायदा घेत फरार होण्यात यशस्वी झाला. या दोघांविरुद्ध प्रमोद श्रीराम जगताप (रा. बांभोरी) यांच्या फिर्यादीवरून रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, पोलीस चौकशीत दोघां संशयित चोरांकडून फक्त १२ ते १५०० रुपये रोख आढळून आले. मोबाईल व इतर रोकड मात्र,मिळून आली नसल्याचे कळते.