जळगाव (प्रतिनिधी) जामनेर तालुक्यात शुक्रवारी दुपारी २ वाजेच्या सुमारास जोरदार वादळासह मुसळधार पाऊस झाला. या वेळी देवळासगाव व तोंडापूर अशा दोन ठिकाणी वीज पडून ८ गुरे दगावली.
तालुक्यात शुक्रवारी सलग चौथ्या दिवशी झालेल्या वादळामुळे शेती पिकांचे तर नुकसान झाले. तोंडापूर येथे वीज पडून नाशिक जिल्ह्यातील तांदलवाडीच्या साहेबराव शिंदि या मेंढपाळाच्या चार मेंढ्या व दोन शेळ्या दगावल्या आहेत. तसेच वादळामुळे झाड कोसळून बैल दगावल्याची घटना घडली आहे. याबाबत माहिती मिळताच संबंधित गावाच्या तलाठी व कृषी अधिकाऱ्यांना दूरध्वनीवरून तत्काळ पंचनामे करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
तालुक्यात चार दिवसांपासून नैसर्गिक आपत्ती सुरू आहे. यामुळे शेतकऱ्यांसह इतरांच्या नुकसानीबाबत तत्काळ पंचनामे करण्याचे आदेश तलाठी, मंडळ अधिकारी व कृषी विभागाला देण्यात आलेले आहेत. शुक्रवारी वीज पडून ८ दगावली आहेत. ज्यांचे पशुधन दगावले आहे, अशा पशूपालकांना तत्काळ आर्थिक मदत दिली जाणार आहे.
फत्तेपूरसह परिसरात दुपारी दीड वाजेच्या दरम्यान मुसळधार पावसाला सुरुवात झाली. तब्बल दीड तास चाललेल्या पावसामुळे शेतांचे बांध फुटून छोट्या- मोठ्या नद्या नाल्यांना पूर आले होते. अनेक शेतांना तळ्यांचे स्वरूप प्राप्त झाले होते. चार दिवसांपासून होत असलेल्या पाऊस व गारपिटीमुळे परिसरातील शेतकऱ्यांचे केळी, मका, आंबा, ज्वारी अशा पिकांचे मोठे नुकसान झाले आहे.