जळगाव (प्रतिनिधी) शहरातील भगीरथ कॉलनी येथील वक्रतुण्ड अपार्टमेंटमधील बंद फ्लॅट फोडत चोरट्यांनी २ लाख ६१ हजार रूपयांचा ऐवज लंपास केल्याची घटना नुकतीच उघडकीस आली आहे. याप्रकरणी सोमवारी जिल्हापेठ पोलिस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आलीय.
भगीरथ कॉलनी येथील वक्रतुण्ड अपार्टमेंटमध्ये कांचन कदम या कुटूंबासह वास्तव्यास आहेत. वडीलांची तब्येत बरी नसल्यामुळे त्या ६ एप्रिल रोजी आजारी वडीलांना पाहण्यासाठी नाशिक येथे गेल्या होत्या. त्यानंतर वडीलांना उपचारार्थ दुस-या रूग्णालयात हलविणे असल्यामुळे कांचन यांनी त्यांचे पती यांना १४ एप्रिल रोजी नाशिकला बोलवून घेतले. त्यामुळे त्यांच्या फ्लॅट कुलूप बंद होते. दि १४ ते १६ एप्रिलच्या दरम्यान हीच संधी साधून चोरट्यांनी बंद फ्लॅट फोडून ५२ हजार रूपये किंमतीची सोन्याची मंगलपोत, १२ हजार रूपये किंमतीची मंगलपोत, १ लाख ८० हजार रूपये किंमतीची सोन्याची गोफ तसेच ५ हजार रूपये किंमतीचे घड्याळ व १२ हजार रूपयांची रोकड असा एकूण २ लाख ६१ हजार रूपयांचा ऐवज चोरून नेला. याप्रकरणी जिल्हापेठ पोलिसात गुन्हा दाखल झाला असून पुढील तपास पो.नि. बबन आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोहेकॉ महेंद्र पाटील हे करीत आहेत.