जळगाव (प्रतिनिधी) शहरातील गोलाणी मार्केटच्या तळमजल्यावर सोपान गोविंदा हटकर (३०, रा. हरिविठठल नगर) तरूणाचा धारदार शस्त्राने वार करून खून करण्यात आल्याची खळबळजनक घटना रविवारी रात्री १० वाजता घडली.
गोलाणी मार्केटच्या तळमजल्यावर रात्री काही लोकांना सोपान याचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात पडलेला दिसून आल्यानंतर त्यांनी सदर घटनेची माहिती पोलिसांना दिली. त्यानुसार लागलीच अपर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी,उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप गावित, एलसीबीचे निरीक्षक किसन नजन पाटील, शहर पोलीस ठाण्याचे विजयकुमार ठाकूरवाड यांच्यासह पोलीस कर्मचाऱ्यांनी घटना स्थळी धाव घेतली. त्यानंतर पोलिसांनी मृतदेह जिल्हा रूग्णालयात हलविला.
रात्री उशिरापर्यंत मृतदेहाची ओळख अद्याप पटली नव्हती. नंतर मात्र, हा मृतदेह सोपानचा असल्याचे स्पष्ट झाले. दरम्यान, खून होण्यापूर्वी गोलाणी मार्केटच्या तळमजल्यावर काही तरूणांमध्ये वाद झाला होता, त्यातून हा खून झाला असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. घटनास्थळी चॉपरचे खाली कव्हर मिळून आल्यानंतर चॉपरने वार करून खून निर्घृण केल्याचेही स्पष्ट झाले आहे. अज्ञात मारेकरी फरार झाले आहेत.