चाळीसगाव (प्रतिनिधी) तालुक्यातील मुंदखेडे बुद्रक परिसरात गेल्या १५ दिवसांपासून धुमाकूळ घालणाऱ्या बिबट्याला जेरबंद करण्यात वनविभागाला यश आले आहे.
चाळीसगाव तालुक्यातील मुंदखेडे बुद्रूक शिवारात वारंवार बिबट्याचे दर्शन होत असल्याने ग्रामस्थांमध्ये भय पसरले होते. गेल्या तीन चार दिवसांपासून प्रकाश वामन पाटील यांच्या शेतात बिबट्याचा वावर होता. बुधवारी रात्री बिबट्याने त्यांच्या शेतातील वासरू फस्त केले होते. या घटनेची माहिती वन विभागाला दिल्यानंतर वनविभागाने याच ठिकाणी, गुरूवारी सायंकाळी पिंजरा लावला होता. पिंजऱ्यात ठेवण्यासाठी पाेलिस पाटील यशवंत पाटील यांनी हा बोकड उपलब्ध करून दिला. दोन दिवसांपूर्वी बिबट्याने ज्या शेतात वासरू फस्त केले तेथेच वनविभागाने गुरूवारी पिंजरा लावून बिबट्याला पकडले. सहा. वनसनरक्षक एस. के. शिसव, मानद वन्यजीव रक्षक राजेश ठोंबरे, विवेक देसाई, वनपरिक्षेत्र अधिकारी शितल नगराळे, वनपाल जी. एस. पिंजारी यांनी ही मोहीम फत्ते केली.