जळगाव (प्रतिनिधी) विद्यापीठातील नियोजित बहिणाबाई चौधरी पुतळ्या शेजारी संग्रहालय उभारण्यासाठी जिल्हा नियोजन व विकास समितीच्या माध्यमातून निधी उपलब्ध करून दिला जाईल अशी ग्वाही जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री तथा पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी दिली.
महाराष्ट्र शासन व जळगाव जिल्हा नियोजन विकास समिती यांच्या निधीतून कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात उभारण्यात आलेल्या सौर उर्जा प्रकल्पाचे उद्घाटन तसेच बहिणाबाई चौधरी यांच्या पुतळा उभारणीचे भूमिपूजन पालकमंत्री तथा पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्या हस्ते सोमवार दि. १५ जुलै रोजी झाले यावेळी ते बोलत होते. कुलगुरु प्रा.व्ही.एल. माहेश्वरी अध्यक्षस्थानी होते.
ना. गुलाबराव पाटील आपल्या भाषणात म्हणाले की, हे विद्यापीठ या भागातील वैभव आणि शान असल्यामुळे विद्यापीठाच्या विकासासाठी पालकमंत्री या नात्याने जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून निधी उपलब्ध करून दिला जाईल. माझ्या मतदार संघात विद्यापीठ येते याशिवाय बहिणाबाईंचे जन्म गाव आसोदादेखील येते. शैक्षणिक संस्था आणि पर्यटन स्थळ यांचा मतदार संघात समावेश आहे ही आनंदाची बाब आहे. विद्यापीठात होणाऱ्या बहिणाबाईंच्या पुतळ्यामुळे भावी पिढीला बहिणाबाईंचे स्मरण होत राहील. सौर ऊर्जा ही काळाची गरज आहे. विद्यापीठातील सौर ऊर्जा प्रकल्पामुळे पैशांची बचत होईल जिल्ह्यातील शासकीय इमारतींवर सौर ऊर्जेचे प्रकल्प उभे रहावे यासाठी १८ कोटींचा निधी दिला. याशिवाय जळगाव येथील सिव्हील रूग्णालयात उत्तम सुविधा देण्यासाठी निधी उपलब्ध करून दिला. ससून हॉस्पीटल नंतर आता जळगावचा नंबर रूग्णांना सुविधा देण्यात लागेल असा विश्वास पालकमंत्र्यांनी व्यक्त केला व भविष्यातही विद्यापीठाच्या पाठीशी उभे राहण्याची ग्वाही दिली.
अध्यक्षीय भाषणात कुल्रगुरू प्रा.व्ही.एल. माहेश्वरी यांनी विद्यापीठात बहिणाबाईंचा उभा राहणार पुतळा सगळयांनाच प्रेरणा देत राहील. बहिणाबाईंनी जगण्याचे तत्त्वज्ञान आपल्या कवितांमधून मांडले. बहिणाबाई चौधरी यांचे नाव या विद्यापीठाला देणे ही मोठी ऐतिहासिक घटना आहे असे ते म्हणाले. सौर ऊर्जा प्रकल्पामुळे वीज बिलात ३०% बचत होणार असून पर्यावरणाच्या दृष्टीने सौर ऊर्जा एक महत्वपूर्ण उपाय आहे. यामुळे कार्बन फुटप्रिंट कमी होईल. अशी अपेक्षा कुलगुरूंनी व्यक्त केली. जळगाव जिल्हा नियोजन समिती व महाराष्ट्र शासन यांनी या दोन्ही प्रकल्पांसाठी सहकार्य केल्याबद्दल कुलगुरूंनी आभार मानले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जनसंपर्क अधिकारी डॉ. सुनील पाटील यांनी केले. कुलसचिव डॉ. विनोद पाटील यांनी आभार मानले.
यावेळी प्र-कुलगुरू प्रा.एस.टी. इंगळे, व्यवस्थापन परिषद सदस्य राजेंद्र नन्नवरे, प्रा. अनिल डोंगरे, प्रा.एस.टी. भुकन, प्रा.म.सु. पगारे, प्रा. शिवाजी पाटील, प्रा. सुरेखा पालवे, डॉ. पवित्रा पाटील, सीए रवींद्र पाटील तसेच विद्यापीठाच्या प्राधिकरणांचे सदस्य उपस्थित होते.