ठाणे (वृत्तसंस्था) ठाण्यामधील शहापूर तालुक्यामध्ये एका बापाने चक्क पोटच्या मुलीवरच अत्याचार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. एवढेच नाही तर नराधम बापाने पिडीतेच्या पोटातील गर्भाचा मृत्यू झाल्याचे समजताच गर्भाची विल्हेवाट लावली आहे. या प्रकरणाविषयी मुलीच्या आईने पोलीस स्टेशनमध्ये जाऊन तक्रार दाखल केली आहे.
आरोपीला २ मुली असून त्यात एकीचे वय १३ वर्ष आहे, तर दुसरीचे वय ६ वर्ष आहे. आरोपी आणि त्याची पत्नीचे खूप दिवसांपासून पटत नसल्यामुळे वेगळे राहत होते. आरोपी जानेवारी महिन्यांपासून मेंगाळपाडा या ठिकाणी तर त्याची पत्नी भगतपाडा या ठिकाणी राहत होती. यामुळे मोठी मुलगी पित्याबरोबर राहत होती तर लहान मुलगी आईबरोबर भगतपाडा या गावी राहत होती. या दरम्यान आरोपी नराधम पिता मागील ७ महिन्यांपासून मुलीवर लैंगिक अत्याचार करत होता. धक्कादायक म्हणजे या अत्याचारामधून पिडीत मुलगी गर्भवती देखील राहिली होती. काही दिवसांनतर आपोआपच पिडीतेच्या पोटातील गर्भाचा मृत्यू झाला आहे. आरोपीला हा प्रकार समजताच त्याने गर्भाची विल्हेवाट लावली आहे. यामुळे हे प्रकरण दबून राहिले होते.
आरोपीने पुरावे नष्ट करून देखील पिडीतेच्या आईला याविषयी समजले. त्यानंतर पिडीतेच्या आईने मुलीला जवळ घेऊन याविषयी विचारले. तेव्हा मुलीने घाबरलेल्या अवस्थेत झालेल्या सर्व प्रकार सांगितला आहे. मुलीच्या आईला सर्व प्रकरण समजताच तिने तात्काळ पोलीस स्टेशनमध्ये जाऊन याविषयी तक्रार दाखल केली आहे. त्यानंतर लगेच पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले आहे.
















