मुंबई (वृत्तसंस्था) प्राप्तिकर विभागाच्या रडारवर आता बॉलिवूडकर असल्याचं पाहायला मिळतं आहे. कर वसुली आणि कर भरणा संदर्भात बॉलिवूडच्या काही प्रसिद्ध कलाकार तापसी पन्नू, अनुराग कश्यप, मधु मेंटेना, विकास बहल यांच्या घरी आयकराने सकाळी छापेमारी केली आहे. फँटम फिल्म्स संबंधित ही छापेमारी करण्यात आली आहे.
विकास बहल, अनुराग कश्यप आणि मधु मेंटेना याच्या फॅन्टम फिल्मस संबंधित कर चोरी प्रकरणातील आहे. हे तिघेही या प्रोडक्शन हाऊसचे संस्थापक आहेत तर अनुराग कश्यप या प्रोडक्शन हाऊसचा मालक आहे. अनुराग कश्यप, विकास बहल व मधू मंटेना यांच्या घरावरील छापेमारीचं मुख्य कारण त्यांची निर्मिती संस्था आहे. फॅन्टम फिल्म्स या निर्मिती संस्थेत कर चोरीच्या घटना समोर आल्याने आयकर विभागाने हे पाऊल उचलले. हे तिघेही फॅन्टम फिल्म्सचे हिस्सेदार आहेत तर अनुराग या संस्थेचे मालक आहेत. २०१० साली या संस्थेची स्थापना करण्यात आली होती. ही संस्था चित्रपट निर्मिती व वितरणाचे काम करायची. २०१५ साली रिलायन्स इंटरटेन्मेण्टने या संस्थेची ५० टक्के भागीदारी स्वीकारली होती. २०१८ साली कलाकाराचे लैंगिक शोषण केल्याचा आरोप विकास यांच्यावर लागला होता. त्यानंतर, त्यांना या संस्थेतून काढून टाकण्यात आलं होतं. त्यानंतर, ही संस्था बंद करण्यात आली. मुंबई आणि पुण्यात मिळून एकूण २२ ठिकाणी आयकर विभागाची ही मोहीम सुरू आहे.
तापसीने आजवर अनेक चित्रपटात उत्कृष्ट भूमिका केल्या आहेत. बॉलिवूडमध्ये तिची स्वतःची अशी वेगळी ओळख आहे. परंतु तापसीच्या घरावर छापेमारी का करण्यात आली आहे, याचे कोणतेही कारण समोर आलेलं नाही. तापसी पन्नू गेल्या वर्षी प्रदर्शित झालेल्या अनुभव सिन्हाच्या थप्पड या चित्रपटात दिसली होती. या वर्षी फेब्रुवारी महिन्यात ‘लूप लपेटा’ या चित्रपटाची घोषणा करण्यात आली आहे. या चित्रपटाचे शूटिंग सुरु झाले आहे. या व्यतिरिक्त तापसी ही अनुराग कश्यपच्या आगामी थ्रिलर फिल्म ‘दोबारा’ या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या वर्षी जानेवारी महिन्यात तिच्या स्पोर्ट्स ड्रामा असलेल्या ‘रश्मी रॉकेट’ या चित्रपटाचे शूटिंग संपले आहे.
तापसी पन्नू आपल्या अभिनयासोबतच सोशल मीडियावर वेगवेगळ्या विषयांवर आपली मते मांडण्यास प्रसिद्ध आहे. देशातील सुरु असलेल्या परिस्थितीवर तिने अनेकदा आपले मत निर्भिडपणे व्यक्त केलं आहे. अनुराग कश्यप आता आपल्या ‘दोबारा’ या चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. काही दिवसांपूर्वीच त्याने ही माहिती दिली होती.
















