मुंबई (वृत्तसंस्था) नव्या महिन्याच्या सुरुवातीला नवे नियम लागू होणार आहेत. १ ऑगस्टपासून आर्थिक व्यवहारासंबंधीच्या काही नियमांमध्ये बदल होणार आहेत. याचा थेट परिणाम तुमच्या-आमच्यावर होईल. भारतीय रिझर्व्ह बँकेने एटीएममधून पैसे काढण्यावरील शुल्कात वाढ केली आहे. याशिवाय तुमचा पगार किंवा पेन्शन सुट्टीच्या दिवशीही खात्यामध्ये जमा होईल. यात एकूणच ५ महत्वाचे बदल होत आहेत.
१. बँकिंग व्यवहार रविवारी आणि इतर सुटीच्या दिवशी सुद्धा होणार आहेत. भारतीय रिझर्व्ह बँकेने नॅशनल ऑटोमेटेड क्लिअरिंग हाउस (NACH) सिस्टिम आठवड्यातील ७ दिवस सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. अर्थातच या बदलामुळे पगार आणि पेन्शन रविवार, बँक हॉलिडे आणि इतर सुटीच्या दिवसांमध्ये सुद्धा जमा केले जाणार आहेत. यासोबतच सुटीच्या दिवशी सुद्धा आता EMI पेमेंट कापल्या जाणार आहे.
२. ICICI बँकेतून पैसे काढणे, जमा करणे आणि चेक बुकसह इतर चार्जेसमध्ये बदल करण्यात आला आहे. या बँकेच्या ग्राहकांना आता बँकेच्या शाखेत चेकच्या माध्यमातून केवळ ४ वेळा व्यवहार करता येतील. अर्थात एवढाच व्यवहार मोफत राहील. यानंतर पैसे काढणे किंवा जमा करण्यासाठी प्रत्येकवेळा १५० रुपये अतिरिक्त चार्ज द्यावा लागणार आहे. ATM च्या माध्यमातून आपण ६ मेट्रो शहरांमध्ये महिन्यातून केवळ ३ वेळा व्यवहार करू शकता. नॉन-मेट्रो शहरांमध्ये ५ वेळा मोफत व्यवहार करता येतील. यानंतर तुम्हाला चार्ज द्यावा लागेल. मेट्रो शहरांमध्ये अतिरिक्त एटीएम व्यवहारांसाठी २० रुपये तर इतर शहरांमध्ये प्रत्येकवेळा ८.५० रुपये कापले जाणार आहेत.
३. १ ऑगस्ट पासून एटीएम चार्जेस वाढवून १७ रुपये करण्यात आले आहेत. यापूर्वी १५ रुपये आकारले जात होते. नॉन-फायनान्शिअल ट्रांझॅक्शनवर सुद्धा ५ रुपये ऐवजी ६ रुपये मोजावे लागणार आहेत. बँका ग्राहकांच्या सुविधेसाठी जागो-जागी एटीएम लावत असतात. इतर बँकांचे ग्राहक सुद्धा यातून पैसे काढू शकतात. मात्र, त्याची मर्यादा निश्चित करण्यात आली आहे. त्यापेक्षा अधिक वेळा व्यवहार केल्यास ग्राहकांकडून फी घेतली जाते. याला इंटरचेंज फीस असेही म्हटले जाते.
४. इंडियन पोस्ट पेमेंट बँक (IPPB) ची डोअर स्टेप सेवा आता मोफत नाही. त्यासाठी शुल्क द्यावा लागणार आहे. IPPB च्या माहितीनुसार, आता प्रत्येक डोअर स्टेप बँकिंग सेवेसाठी २० रुपये + GST द्यावा लागणार आहे. यासोबतच, कुठल्याही ग्राहकाला पैसे ट्रांसफर करणे आणि मोबाईल पेमेंट इत्यादींसाठी IPPB २० रुपये +GST शुल्क आकारणार आहे. IPPB च्या खात्यातून दुसऱ्या बँकेत पैसे ट्रांसफर करताना हा शुल्क द्यावा लागेल.
५. दर महिन्याच्या पहिल्या तारखेला एलपीजी सिलेंडरच्या किंमतींची घोषणा केली जाते. जुलै महिन्यात सरकारने १४.२ किलो घरगुती गॅस सिलेंडरच्या किमतीमध्ये २५.५० रुपयांची वाढ केली आहे. उल्लेखनीय बाब म्हणजे, आता सबसिडी सुद्धा नाहीच्या बरोबरीला आली आहे.