भुसावळ ः रावेर तालुक्यातील निंभोरा पोलिसांनी गुरे चोरणार्या आंतरराज्यीय टोळीला बेड्या ठोकल्या आहेत. आरोपींनी फैजपूरसह मुक्ताईनगर, रावेर, सिल्लोड, पंधाना (जि.खंडवा, मध्यप्रदेश) येथून पधूधनाच्या दहा चोर्या केल्याची कबुली दिली आहे. आरोपींच्या ताब्यातून 11 म्हशी, दोन बोलेरो व दोन दुचाकी मिळून एकूण 16 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
या आरोपींना अटक
तुकाराम रुमालसिंह बारेला (बोरी, जि.बर्हाणपूर), धर्मेंद्र दुरसिंग बारेला (ढेरिया, जि.खंडवा), शांताराम बिल्लरसिंह बारेला (हिवरा, जि.बर्हाणपूर), सुभाष प्रताप निंगवाल (दहिनाला, जि.बर्हाणपूर), मस्तरीराम काशीराम बारेला (न्हावी, ता.रावेर) अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत.
सीसीटीव्हीवरून गुन्ह्यांची उकल
निंभोरा पोलीस ठाणे हद्दीत 24 एप्रिल व 10 जून रोजी झालेल्या गुरे चोरीच्या अनुषंगाने परिसरातील तब्बल 60 सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केल्यानंतर चोरटे हे आंतरराज्यीय असल्याचे स्पष्ट झाले तर संशयीत तुकाराम बारेला हा न्हावी, ता.यावल येथे आल्याची माहिती मिळाल्यानंतर फैजपूरचे सहाय्यक निरीक्षक निलेश वाघ यांना सूचित केल्यानंतर त्यांच्यासह पथकाने त्यास अटक केली. आरोपीची चौकशी केल्यानंतर अन्य आरोपींची नावे समोर आली. अन्य आरोपी धर्मेंद्र बारेला याच्याविरोधात तब्बल 14 गुन्हे दाखल असून तो पंधाना, जि.खंडवा येथील हिस्ट्रीशीटर असून मध्यप्रदेशातील चार जिल्ह्यातून त्यास हद्दपार करण्यात आले आहे.
यांनी आवळल्या आरोपींच्या मुसक्या
ही कारवाई निंभोरा सहाय्यक निरीक्षक हरिदास बोचरे, उपनिरीक्षक राजेंद्र पाटील, एएसआय ज्ञानेश्वर पाटील, अशरफ शेख, हवालदार स्वप्नील पाटील, नाईक सुरेश अढांयगे, सुरेश पवार, मयूर निकम, किरण जाधव, अमोल वाघ तसेच फैजपूरचे सहा.निरीक्षक निलेश वाघ, एएसआय विजय चौधरी, एएसआय देविदास सुरदास, हवालदार राजेश बर्हाटे, हवालदार महेंद्र महाजन, रावेरचे हवालदार ईश्वर चव्हाण, कॉन्स्टेबल सचिन घुगे, जळगाव गुन्हे शाखेचे ईश्वर पाटील, मिलिंद जाधव, गौरव पाटील आदींच्या पथकाने केली.