मुंबई (वृत्तसंस्था) आर्यन खान आणि इतर पाच प्रकरणांचा तपास आपल्याकडून काढून घेण्यात आला नाही, तो आता केंद्रीय संस्थेच्या मार्गदर्शनाखाली होणार आहे, अशी माहिती एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांनी दिली आहे.
समीर वानखेडे एका वृत्तसंस्थेशी बोलताना म्हणाले की, “आर्यन खान केस प्रकरणाचा तपास माझ्याकडून काढून घेण्यात आला नाही. या संबंधी मीच न्यायालयात एक रिट पीटिशन दाखल केली होती आणि या प्रकरणाचा तपास केंद्रीय संस्थेकडून करण्यात यावा अशी मागणी केली होती. त्यामुळे आर्यन खान आणि समीर खान यांच्या प्रकरणाचा तपास आता दिल्लीतील केंद्रीय तपास यंत्रणेच्या एसआयटी कडून करण्यात येणार आहे. त्यामुळे हा तपास आता एनसीबीच्या दिल्लीतील आणि मुंबईतील टीममध्ये समन्वयाने करण्यात येणार आहे.”
दिल्ली एनसीबीची एक टीम उद्या मुंबईमध्ये येणार आहे. आर्यन खान आणि नवाब मलिकांचे जावाई समीर खान यांच्यासह इतर चार केसचा तपास आता या टीमकडून करण्यात येणार आहे. अरमान कोहली, इक्बाल कासकर, काश्मीर ड्रग्ज या प्रकरणाचा समावेश आहे. दरम्यान मुंबई एनसीबीच्या विभागीय संचालकपदाची जबाबदारी समीर वानखेडे यांच्याकडे कायम राहणार आहे. या सहा प्रकरणाचा तपास दिल्ली एनसीबीचे अधिकारी संजय सिंग यांच्या नेतृत्वाखाली केला जाणार आहे.
समीर वानखडे हे मुंबई एनसीबीचे झोनल डायरेक्टर या पदावर होते आणि त्या पदावरच ते राहणार आहेत. मात्र ते आता रिपोर्टिंग दिल्ली एनसीबीच्या अधिकाऱ्यांना करणार आहेत. या सहा प्रकरणा व्यतिरिक्त आधीच्या प्रकरणांचा तपास समीर वानखेडे यांच्याकडेच असणार आहे. मात्र नवीन एखादी कारवाई करण्यासाठी आता त्यांना दिल्ली एनसीबीच्या अधिकाऱ्यांना कळवावे लागणार असून त्यांची परवानगी लागणार आहे.