मुंबई (वृत्तसंस्था) राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज, तसेच महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांच्यासंदर्भात केलेल्या वादग्रस्त वक्तव्यांची पार्श्वभूमी होती. त्यावरुन आता राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष, ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. हल्लीच्या राज्यपालांवर भाष्य न केलेलेच बरे. कोणत्या पातळीवर केंद्र सरकार घसरुन जात आहे याचे उदाहरण महाराष्ट्रात पाहायला मिळत आहे, असं पवार म्हणाले.
“हल्लीच्या राज्यपालांवर भाष्य न केलेले बरे. केंद्र सरकार घसरुन कोणत्या पातळीवर जात आहे याचे उदाहरण महाराष्ट्रात पाहायला मिळत आहे. राज्यातील मंत्रीमंडळाला विधानसभा, विधानपरिषदेवर सभासद नेमण्याचा अधिकार आहे. वर्ष होऊन गेले तरी १२ आमदारांच्या बाबतीत निर्णय घेतला जात नाही. याचा अर्थ काय? ज्या पदाची प्रतिष्ठा महाराष्ट्रात अनेकांनी सांभाळली ती आम्ही ठेवणारच नाही हा निर्धार ठेऊन कोणी काम करत असेल त्याच्यावर भाष्य न केलेले बरे. राष्ट्रपती आणि पंतप्रधानांनी त्याचा विचार करावा,” असे शरद पवार यांनी म्हटले.
राज्यपालांसारख्या महत्त्वाच्या पदावर बसलेल्या व्यक्तीने विचार करून बोलायला हवे, अशा शब्दांत राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज्यपालांनी केलेल्या वक्तव्यांवर प्रतिक्रिया दिली आहे. राज्यपाल हे एक मोठे पद आहे. महत्त्वाच्या पदावर बसलेल्या व्यक्तीने बोलत असताना आपल्याकडे सगळय़ांचे लक्ष असते हे लक्षात ठेवावे आणि विचार करून बोलावे असे अजित पवार यांनी म्हटले आहे.