पिंपरी (वृत्तसंस्था) पिंपरी नजीक असणाऱ्या थेरगाव येथील एका मालकाने दुकानात कामाचे आगाऊ पैसे देण्यास नकार दिल्याच्या कारणातून संबंधित कामगाराने रागाच्या भरात थेट दुकान पेटवून दिलं आहे. याप्रकरणी दुकान मालकाने कामगाराविरोधात फिर्याद दाखल केली असून आरोपी कामगाराला वाकड पोलिसांनी अटक केली आहे.
प्रकाश शंकरराव सोनकांबळे असं अटक केलेल्या आरोपी कामगाराचं नाव असून तो भालकी जिल्ह्याच्या बिदर येथील रहिवासी आहे. शंकर लक्ष्मण सोनवणे असं दुकान मालकाचं नाव असून थेरगावातील दत्तनगर येथे ओमसाई कुशन नावाचं त्यांचं दुकान आहे. आरोपी सोनकांबळे हा याच दुकानात कामगार होता. आरोपी प्रकाश याने दुकानात काम केल्याचे आगाऊ पैसे मालक सोनवणे यांच्याकडे मागितले. पण मालकाने पैसे देण्यास नकार दिला. यामुळे दोघांमध्ये वाद झाला. हा वाद वाढत जाऊन कामगाराने मालकाला शिवीगाळही केली. मालकाविषयीचा राग मनात धरून आरोपी प्रकाश याने संधी मिळतात थेट दुकानाला आग लावली. काही कळायच्या आत आरोपीनं आग लावल्याने दुकानाच मोठं नुकसान झालं आहे. तसेच या आगीमुळे बाजूच्या अन्य दुकानांचंही मोठं नुकसान झालं आहे. सुदैवाची बाब म्हणजे या घटनेत कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाली नाही.
हा प्रकार घडल्यानंतर, दुकान मालक शंकर लक्ष्मण सोनवणे यांनी वाकड पोलीस ठाण्यात जाऊन आरोपी कामगाराविरोधात फिर्याद दाखल केली आहे. याप्रकरणी पोलिसांनी विविध कलमाअंतर्गत गुन्हा दाखल करत आरोपी कामगाराला अटक केली आहे. या घटनेचा पुढील तपास वाकड पोलीस करत आहेत.