बारामती (वृत्तसंस्था) धनुष्यबाण हे शिवसेनेचे चिन्ह आहे. एखाद्या पक्षाचं चिन्ह काढून घेणं योग्य नाही, असं म्हणत राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी जर एकनाथ शिंदे यांना वेगळी भूमिका घ्यायची असेल तर वेगळा पक्ष काढू शकतात असंही म्हटले आहे. बारामती येथील त्यांच्या गोविंदबाग निवासस्थानी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.
शरद पवार पुढे म्हणाले की, आपण काँग्रेसमधून बाहेर पडल्यानंतर वेगळा पक्ष काढला, त्यावेळी चिन्हं घेतलं. त्यांचं चिन्ह आम्ही मागितलं नाही असं उदाहरण देत, नको तो वाद वाढवणं शक्य नसल्याचं ते म्हणाले. श्रीलंकेत एकाच कुटुंबाची सत्ता होती. राष्ट्रपती, प्रधानमंत्री, अर्थमंत्री हे एकाच कुटुंबातील होते. श्रीलंकेत सत्तेचं केंद्रीकरण झालं त्यामुळे असंतोष वाढला आणि जनतेचा उद्रेक झाला असं वक्तव्य राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी केलं. सत्ता केंद्रीत जिथे झाली तिथे हे प्रश्न निर्माण झाले. भारतात राष्ट्रीय पातळीवर सत्ता केंद्रीत होते की काय याची शंका लोकांमध्ये निर्माण होते आहे. सध्या आपल्याकडे उद्रेक होण्याची परिस्थिती दिसत नाही पण आपण सावध राहण्याची शक्यता आहे, असा इशाराही त्यांनी दिला.
















