जळगाव (प्रतिनिधी) जळगावातील जैन उद्योग समूह हा सामाजिक कार्यात सतत पुढे असतो. अशातच आता जैन उद्योग समूहाने एक आदर्श निर्माण केला आहे. ‘समाजाचं आपण काही देणं लागतो’ या उदात्त भावनेतून जैन उद्योग समूहाने ‘स्नेहाची शिदोरी’ हा सामाजिक उपक्रम वर्षभरापूर्वी सुरू केला. या उपक्रमातून आतापर्यंत स्नेहाच्या शिदोरीची १० लाखांहून अधिक पाकिटे गरजूंना वाटप करण्यात आली असून लाखो लोकांनी त्याचा लाभ घेतला.
स्नेहाची शिदोरी उपक्रमात गरजू नागरिकांना सकाळी आणि सायंकाळी सात्त्विक व रुचकर जेवणाच्या पाकिटांचे वाटप केले जाते. जैन हिल्स येथील स्वयंपाक घरात ४० पेक्षा अधिक कर्मचारी सकाळ व संध्याकाळ अशा दोन्ही वेळी जेवण बनवतात. त्यानंतर जेवणाची पाकिटे तयार करतात. ही पाकिटे वाहनातून शहरातील कांताई सभागृहात आणली जातात. तेथे गरजू नागरिकांना जेवणाच्या पाकिटांचे विनामूल्य वाटप केले जाते. दरम्यान, या साऱ्या प्रक्रियेत कर्मचारी सुरक्षेचे सर्व निकष, जसे की मास्क व ग्लोजचा वापर, परस्परात शारीरिक अंतर, निर्जंतुक पॅकिंग तसेच सुरक्षित पुरवठा असे निकष पाळले जातात. दररोज नित्यनेमाने गरजूंसाठी वेळेत जेवणाची पाकिटे पोहचविण्यात येतात.
वर्षभरापूर्वी कोरोना महामारीला सुरुवात झाली. तेव्हा प्रादुर्भाव रोखण्यासाठी टाळेबंदी जाहीर करण्यात आली. या काळात हाताचे काम गेल्याने अनेकांवर उपासमारीची कुऱ्हाड कोसळली. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन जैन उद्योग समूहाचे अध्यक्ष अशोक जैन यांनी गोरगरिबांच्या दोन वेळच्या जेवणाची व्यवस्था करण्याचा निर्णय घेतला. त्यांच्या मार्गदर्शनाखाली १ एप्रिल २०२० पासून ‘स्नेहाची शिदोरी’ उपक्रमाला सुरुवात झाली. हा उपक्रम सुरू होऊन काही दिवस झाल्यानंतर जैन उद्योग समूहाचे संस्थापक अध्यक्ष स्वर्गीय भवरलाल जैन यांच्या ८३ व्या जन्मदिनाचे औचित्य साधून अशोक जैन यांनी हा उपक्रम अविरतपणे सुरू ठेवण्याची घोषणा केली. जळगावातील एकही गरजू नागरिक उपाशी पोटी झोपू नये, हा त्यांचा त्यामागचा हेतू होता. जैन उद्योग समुहाने सुरू केलेला स्नेहाची शिदोरी हा उपक्रम अतिशय प्रेरणादायी आहे.