जळगाव (प्रतिनिधी) जळगाव एसटी वर्कशॉपमध्ये 2 लाखांचा अपहार केल्याप्रकरणी लिपिकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हेमराज युवराज पाटील (रा. चिंचोली, ता. यावल) असे गुन्हा दाखल झालेल्या लिपिकाचे नाव आहे.
या संदर्भात अधिक असे की, ट्रान्सपोर्टमधून सामान सोडवून आणण्यासाठी १ लाख ९९ हजार ३७० रुपयांची रक्कम उचलून त्याचे समायोजन न करता एस.टी. वर्कशॉपच्या आवक शाखेतील लिपिकाने अपहार केल्याची धक्कादायक बाब चौकशी अहवालातून समोर आली आहे. याप्रकरणी लिपिकाविरुद्ध विभागीय भांडार अधिकारी यांच्या फिर्यादीवरून एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
लिपिक पाटील यांच्याकडे ट्रान्स्पोर्टमधून सामान सोडवून आणण्याची जबाबदारी सोपविण्यात आली होती. त्यासाठी तो अग्रीम रक्कम लेखा शाखा विभाग कार्यालय येथून उचलत होता. दरम्यान, त्याने १५ मार्च २०१९ ते २४ सप्टेंबर २०१९ या कालावधीत ट्रान्स्पोर्टमधून सामान आणण्याच्या नावाखाली १ लाख ९९ हजार ३७० अग्रीम रक्कम घेऊनसुद्धा त्याचे समायोजन केले नाही. हा प्रकार वरिष्ठांच्या लक्षात आल्यानंतर हेमराज पाटील याला वेळोवेळी पत्रव्यवहार करून पैशांबाबत विचारणा करण्यात आली. मात्र, पाटील याने कुठलाही प्रतिसाद दिला नाही.
अखेर चौकशी समिती नेमण्यात आली. चौकशीअंती चौकशी अधिकारी संदीप बाविस्कर यांनी हेमराज पाटील याने अपहार केल्याचा अहवाल दिला. त्यानुसार मंगळवारी एस.टी. वर्कशॉपचे विभागीय भांडार अधिकारी विशाल राखोंडे यांच्या फिर्यादीवरून लिपिक हेमराज पाटील याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.
















