जळगाव (प्रतिनिधी) तालुक्यातील ममुराबाद रस्त्यावरील मनुदेवी मंदीराजवळ छोटी मालवाहू वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी घडली. सुरेश गणपत कुंभार-हिवरकर (वय-४०, रा. चौघुले प्लॉट,, जळगाव) असे मृत झालेल्या व्यक्तीचे नाव आहे.
सुरेश कुंभार यांचा ममुराबादला विटभट्टीचा व्यवसाय आहे. तेथेच जाण्यासाठी मंगळवारी सकाळी साडेसात वाजेच्या सुमारास सुरेश कुंभार हे आपला मित्र दिलीप कुंभार यांच्यासोबत दुचाकीने (एम.एच. ४१ एच. ९९८१) निघाले होते. सकाळी ८ वाजेच्या सुमारास मनुदेवी मंदीराजवळच चोपड्याकडून जळगावकडे बैलजोडी घेवून येणाऱ्या एका छोट्या मालवाहतूक (एम.एच. १९ सी.वाय. ८१७३) करणाऱ्या वाहनाने सुरेश कुंभार यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली.
या धडकेत दुचाकीवरील सुरेश कुंभार हे जागेवरच ठार झाले. तर सोबत असलेले दिलीप कुंभार हे जखमी झाले. याप्रकरणी जळगाव तालुका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. दरम्यान, सुरेश कुंभार यांना तीन बहिणी असून, तिघा बहिणींचा एकुलता एक भावाचा अचानक अपघातामुळे मृत्यू झाल्यामुळे कुटुंबियांचा आक्रोश मन हेलावून सोडणारा होता. सुरेश कुंभार यांना एक मुलगा आणि मुलगी आहे.