जळगाव (प्रतिनिधी) शहरातील एका ४० वर्षीय डॉक्टरला हनी ट्रॅपमध्ये (Honey Trap) अडकवून त्याच्याकडून ७ लाखांची खंडणी (extort ७ lakh) मागितल्याप्रकरणी चार महिलांसह ८ जणांविरुद्ध शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. धक्कादायक म्हणजे आरोपींनी डॉक्टरला शिवीगाळ करत मारहाण देखील करण्यात आली आहे.
या संदर्भात डॉक्टरने दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, संशयित आरोपींनी संगनमत करुन कट रचला. आणि डॉक्टरला शरीरसुखाची ऑफर देत दोघा महिलांच्या साथीदारांनी व्हिडीओ चित्रीकरण करुन घेतले. यापैकी एक महिला जळगाव शहरातील व दुसरी यावल तालुक्यातील आहे. या व्हिडीओ चित्रीकरणाच्या बळावर चेतन व हिरामन नावाच्या दोघांनी डॉक्टरला चापटाबुक्क्यांनी मारहाण करत व्हीडीओ व्हायरल करण्याची धमकी दिली. प्रदिप व संदीप या दोघांच्या मदतीने सात लाख खंडणीची मागणी करण्यात आली. सात लाख रुपये दिले तरच तुमचे मॅटर संपेल नाहीतर हे व्हिडीओ व्हायरल केले जाईल व तुमची समाजात बदनामी होईल, जीवनातून उठवून टाकण्याची धमकी देण्यात आली.
शेवटी या त्रासाला कंटाळून डॉक्टरने शहर पोलीस स्थानक गाठत फिर्याद दिली. याप्रकरणी ४ महिलांसह चेतन राजेंद्र कासार, हिरामण एकनाथ जोशी, प्रदीप सुरेश कोळी, (सैदाणे), संदीप बबन लोंढे (सर्व रा. जळगाव) यांच्याविरुद्ध गुन्हा जळगाव शहर पोलिस स्टेशनला गु.र.न. 336/22 भा.द.वि. 389, 323, 506, 34, 120(ब) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्यात चार महिला व चार पुरुष अशा एकुण आठ जणांचा समावेश आहे. पुढील तपास पोलिस उप निरीक्षक सर्जेराव क्षिरसागर करत आहेत.