जळगाव (प्रतिनिधी) गंभीर गुन्ह्यात अडकवण्यासाठी विजय भास्कर पाटील व किरणकुमार साळुंखे यांनी कट रचून घरात धारदार शस्त्र ठेवल्याची तक्रार नीलेश भोईटे यांनी शुक्रवारी रात्री शहर पोलिस ठाण्यात दिली. याप्रकरणी पाटील व साळुंखे याा दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
भोईटे यांनी दिलेला फिर्यादीनुसार, त्यांच्याविरुद्ध निंभोरा पोलिस ठाण्यात दाखल असलेला गुन्हा पुणे येथे वर्ग केला आहे. या गुन्ह्यात कोथरूड पोलिसांनी जळगावच्या स्थानिक पोलिसांच्या मदतीने भोईटे यांच्या जळगावातील भोईटे नगरातील घरी ९ जानेवारी २०२२ रोजी छापा टाकला होता. यावेळी भोईटे घरी नव्हते. या कारवाईत पोलिसांनी तपासणी केल्यानंतर विजय भास्कर पाटील व किरणकुमार साळुंखे हे त्यांच्या स्विफ्ट डिझायर कारने (क्र. एमएच.२०.बीएन.०९०) रात्री १०.१५ ते १०.३० वाजेच्या सुमारास त्यांच्या इतर साथीदारांसोबत आले. त्यांनी बेकायदेशीरपणे घरात प्रवेश केला. घरत प्रवेश केल्यानंतर सोबत आणलेल्या काळ्या रंगाच्या कापडी पिशवीत काही फाइल्स व रक्ताने माखलेला चाकू घरात ठेवला. यामागे मला गंभीर गुन्ह्यात अडकवण्याचा कट आहे. या सर्व बाबींचे सीसीटीव्ही फुटेज व रेकॉर्डिंग असल्याचे भोईटे यांनी तक्रारीत म्हटले आहे. याप्रकरणी शहर पोलिस ठाण्यात विजय भास्कर पाटील व किरणकुमार साळुंखे व साथीदारांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास निरीक्षक विजयकुमार ठाकूरवाड करत आहे.