जळगाव (प्रतिनिधी) जन आरोग्याचे हित विचारात घेता सखोल चौकशी होण्यासाठी पोलीस विभाग, केन्द्रीय अन्न परवाना अधिकारी तसेच जळगाव जिल्हा अन्न व औषध विभाग यांचे संयुक्त विशेष पथक स्थापन करुन सखोल तपास करण्यात यावा, असे पत्र आज जळगाव एफडीएने पोलिसांना दिले आहे. दरम्यान, आज पोलीस कोठडी संपल्यानंतर अटकेतील संशयित आरोपींना न्यायालयात हजर केले असता सर्वांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली.
‘स्पॉईल्ड फॅट’ पदार्थ मानवी सेवणास अपायकारक
अन्न व औषध प्रशासन विभागाचे सहाय्यक आयुक्त संदीप पतंगे यांनी आज तपासधिकारी तथा सहाय्यक पोलीस अधीक्षक (गृह) संदीप गावित यांना एक पत्र दिले आहे. या पत्रात श्री. पतंगे यांनी म्हटले आहे की, जळगाव जिल्हा सहकारी दुध उत्पादक संघाने ‘स्पॉईल्ड फॅट’ या अखाद्य पदार्थाचे उत्पादन करुन त्याची विक्री विठ्ठल रुखमीनी एजन्सी यांना विक्री केलेली आहे. तर मे.विठ्ठल रुखमीनी एजन्सीचे हरी रामु पाटील यांनी मे.केलादेवी कुटीर उद्योग व रवि अग्रवाल (अकोला) यांनी राजेमलाई चॉकलेट या अन्न् पदार्थ उत्पादक कंपणीला विक्री केलेले आहे. तथापि सदर ‘स्पॉईल्ड फॅट’ हा पदार्थ मानवी सेवणास अपायकारक (अखादय) असल्याकारणाने या प्रकरणी जाणीवपूर्वक विक्री व खरेदी बिले दिली व घेतली गेलेली नाहीत असे दिसून येते. परंतु याबाबतचा अर्थिक व्यवहार झाला असल्याचे पोलीस तपासात उघड झाले आहे.
मागील दोन वर्षापासून विना बिल व्यवहार सुरु
‘स्पॉईल्ड फॅट’ खरेदी करुन त्याचा वापर राजेगलाई चॉकलेटमध्ये केल्याचे दिसून येते. मे. केलादेवी कुटीर उद्योग, अकोला चे रवि अग्रवाल यांनी त्यांच्या जबाबात त्यांनी हरी पाटील यांच्याकडून तूपाचा उपयोग चॉकलेट या अन्न पदार्थाचे उत्पादन करण्याकरीता केला असे कबूल केले आहे. परंतू त्यांनी ‘स्पॉईल्ड फॅट’ खरेदी केला नाही, असे सांगीतले. तर हा व्यवहार मागील दोन वर्षापासून विना बील सुरु होता, असे पोलीस तपासात निष्पन्न झाले असल्याचे दिसून येते.
दुध संघाकडून केंद्रीय अन्न सुरक्षा व मानके कायद्याचे उल्लंघन !
जळगाव दूध उत्पादक संघाने केंद्रीय अन्न सुरक्षा व मानके कायद्या अंतर्गत केंद्रीय अन्न परवाना घेतला असून सदर परवान्यात फक्त अन्न पदार्थाचे उत्पादन, पॅकिंग व विक्री करण्यासाठीच दिलेला आहे. तसेच अन्न परवाना अट क्र. ६ नुसार Food Business Operators Shall: Ensure that no product other than the product indicated in the license is produced in the unit, म्हणजेच अन्न परवान्यावर नमुद असलेल्या पदार्था व्यतिरीक्त इतर कोणताही पदार्थ अस्थापनेमध्ये उत्पादीत करता येणार नाही, असे असतांनाही ‘स्पॉईल्ड फॅट’ या अखाद्य पदार्थाचे बेकायदेशीर उत्पादन करुन त्यांच्या अधिकृत एजन्सी (मे. विठठल रुखमीनी एजन्सी) या अन्न अस्थापनेमार्फत विक्री केल्याची बाब स्पष्ट झालेली आहे. तसेच दुध उत्पादक संघ मर्या., जळगाव या अन्न अस्थापनेच्या नॉमिनी व व्यवस्थापक (गुणवत्ता हमी) विजेश परमार हे की, परवान्याच्या अटीचे पालन करण्यासाठी जबाबदार व्यक्ती आहे.
…त्यामुळेच यात बिलिंग झाली नाही !
विठ्ठल रुखमाई एजन्सीने किरकोळ विक्रेता (Trade/Retail- Retailer) म्हणून परवाना घेतलेला आहे. परंतू सदर त्यांचे काही बिले (Tax Invoice milk product credit memo) बघितल्यावर हे सिध्द होते की, सदर अन्न अस्थापना जळगाव जिल्हा सहकारी दुध उत्पादक संघाने उत्पादीत केलेले अन्न पदार्थाची घाऊक विक्री (Wholesale) करीत आहे. तसेच अन्न पदार्था बरोबर ‘स्पॉईल्ड फॅट’ या अखद्या पदार्थाची ही घाऊक विक्री मे. नंदकुमार स्टोअर्स, जळगाव या अन्न अस्थापनेस केलेली असल्याची बाबही उघड झाली आहे. विठ्ठल रुखमीनी एजन्सीने मे. केलादेवी कुटीर उद्योगाला (अकोला) तुपाची विक्री करतांना जाणीवपूर्वक विक्री बिल दिलेले नाहीत. परंतु ते खरेदी केल्यानंतर त्याबाबतची किंमत मे. विठ्ठल रुखमिनी एजन्सीचे हरी पाटील यांना दिलेली आहे. याबाबत मे, केलादेवी कुटीर उद्योग, अकोलाचे रवि अग्रवाल यांनी त्यांच्या जबाबात कबुलही केले आहे. तथापि प्रत्यक्षात मे कैलादेवी कुटीर उद्योग, अकोला यांनी सदर तुप १०९ रुपये एवढया कमी किमतीत खरेदी केली आहे. त्यामुळे ते ‘स्पॉईल्ड फॅट’ होते व त्यामुळेच यात बीलींग झालेली नाही हे दिसून येते.
जनआरोग्य हिताचे दृष्टिीने सखोल तपास करणे आवश्यक
अन्न परवान्यातील अट क्र. ६ नुसार अन्न परवाण्यावर नमुद असलेल्या पदार्था व्यतिरीक्त इतर कोणताही पदार्थ अस्थापनेमध्ये उत्पादीत करणे ही बाब बेकायदेशीर असतांना जळगाव जिल्हा सहकारी दुध उत्पादक संघाने “स्पॉईल्ड फॅट” हा पदार्थ मानवी आहारात खाण्यासाठी उपयुक्त नसलेला अखाद्य पदार्थ उत्पादीत करुन त्याची मोठया प्रमाणात विक्री केली असल्यामुळे जन आरोग्य धोक्यात आणलेले आहे. अन्न सुरक्षा मानदे कायद्यातील तरतुदी नुसार याची सर्वस्वी जबाबदारी नॉमिनी व व्यवस्थापक (गुणवत्ता हमी) विजेश परमार यांची आहे. याबाबत दुध संघ कधीपासून बेकायदेशीररीत्या ‘स्पॉईल्ड फॅट’चे उत्पादन सुरु केले आहे व आजपर्यंत त्याची विक्री कोणकोणत्या अस्थापनेला केलेली आहे व त्याचा वापर अन्न पदार्थात कोठे-कोठे झाला? याबाबत जनआरोग्य हिताचे दृष्टिीने सखोल तपास करणे आवश्यक आहे.
जाणीवपूर्वक लहान मुलांच्या आरोग्याशी खेळ
पोलीस तपासात सदर स्पॉईल्ड फॅटचा वापर राजेमलाई चॉकलेटमध्ये झाला असल्याचे सिध्द झाले असल्यास हि बाब गंभीर असून जाणीवपूर्वक लहान मुलांच्या आरोग्याशी खेळ करुन त्याचे आरोग्य धोक्यात आणलेले आहे. कुठल्याही प्रकरणात खरेदी केलल्या पदार्थाचे बील घेवुन त्यानुसार त्याचे मुल्य चुकविणे आवश्यक असते. त्यानुसार राजेमलाई चॉकलेटचे उत्पादक मे. केलादेवी कुटीर उद्योग, अकोला यांची जबाबदारी होती. तथापि प्रत्यक्षात मे. केलादेवी कुटीर उद्योग, अकोला यांनी सदर तुप १०९ रुपये एवढया कमी किमतीत खरेदी केली आहे, त्यामुळे ते स्पॉईल्ड फॅट होते व त्यामुळेच यात बीलींग झालेली नाही हे दिसुन येते.
अन्न सुरक्षा व मानके कायदयाचे उल्लंघन !
मे. केलादेवी कुटीर उद्योग, अकोला यांनी अखाद्य पदार्थ म्हणजेच स्पॉईल्ड फॅट हा पदार्थ वापरून राजेमलाई चॉकलेटचे उत्पादन करुन त्याची विक्री केल्याची बाब समोर आल्याने यामध्ये अनेक अन्न अस्थापना सामिल असण्याची शक्यता आहे. त्यामुळे सदर बाब ही जन आरोग्य हिताचे दृष्टिने घातक आहे. जानिवपूर्वक अन्न उपरोक्त नमुद बाबींचा विचार करता सदर प्रकरणी अन्न सुरक्षा व मानके कायदयाचे कलम २६ (२)(), २७(१), २७(२)(c)(1), २७(३) (d) व २७(३) (e) सह वाचन कलम ३(१)(zz) (i) शिक्षा पात्र कलम ५९ नुसार गुन्हा झाला असल्याचे उघड झाल्याचे दिसुन येत आहे. अस्थापनेतुन अखाद्य पदार्थाचे उत्पादन करुन ते अन्न पदार्थाचे उत्पादन करणाऱ्या अस्थापनांना विकुन सदर अखाद्य पदार्थाचा वापर अन्न पदार्थ तयार करण्यासाठी केला असल्याची गंभीर बाब उघड झाल्याने, या सर्व बाबी संगनमताने केल्याचे प्रथदर्शनी दिसुन येत असल्याने याप्रकरणी जन आरोग्य हित विचारात घेवुन सखोल चौकशी होणेसाठी पोलीस विभाग, केन्द्रीय अन्न परवाना अधिकारी तसेच जळगाव जिल्हा अन्न व औषध विभाग यांचे संयुक्त विशेष पथक स्थापन करुन सखोल तपास करण्यात यावा, असे माझे मत असल्याचे अन्न व औषध प्रशासन विभागाचे सहाय्यक आयुक्त संदीप पतंगे यांनी आज तपासधिकारी तथा सहाय्यक पोलीस अधीक्षक (गृह) संदीप गावित यांना दिलेल्या पत्रात म्हटले आहे.