जळगाव (प्रतिनिधी) थकीत वेतनापोटी शहरातील प्रसिद्ध गणपती हॉस्पीटलचे संचालक डॉ. शीतल स्वरुपचंद ओसवाल यांना धनादेश अनादरप्रकरणी दाखल तीन खटल्यांमध्ये ५० लाखांचा दंड आणि प्रत्येकी एक वर्ष तुरुंगवासाची शिक्षा न्या. जान्हवी केळवर यांच्या न्यायालयाने सुनावली आहे.
वेतनापोटी डॉ. ओसवाल यांनी दिले होते ५५ लाखांचे धनादेश !
शहरातील गणपती हॉस्पिटलचे डॉ. शितल ओसवाल यांच्याकडे अनील तोताराम शिरसाळे व त्यांच्या पत्नी २००२ पासून गणपती हॉस्पीटलमध्ये लॅब टेक्निशयन म्हणून सेवा देत होते. वर्षानुवर्ष दिलेल्या सेवेपोटी या दाम्पत्याला वेतनापोटी डॉ. ओसवाल यांनी ५५ लाखांचे धनादेश दिले होते. सोबतच धनादेश दिल्याबाबत एक पत्रही दिले होते. त्यातील १० लाखांचा एक धनादेश वटला होता.
धनादेश न वटल्यामुळे न्यायालयात धाव !
अन्य दहा लाखांचे दोन व पाच लाखांचा एक धनादेश वटला नव्हता. त्यामुळे शिरसाळे यांनी न्यायालयात धाव घेतली आणि धनादेश अनादरप्रकरणी पुरावे सादर केले. त्यानुसार प्रथम वर्ग न्या. जान्हवी केळकर यांच्यासमोर तीनही खटले चालले. त्यात डॉ. ओसवाल दोषी ठरल्याने तीनही खटल्यात त्यांना दंडासह तुरुंगवासाची शिक्षा ठोठावली आहे. शिरसाळे यांच्यावतीने अॅड. आर. आर. गिरनारे व अॅड. हेमंत गिरनारे यांनी काम पाहिले.
तीनही प्रकरणात प्रत्येकी एक वर्षाची शिक्षा !
दि. १२ सप्टेंबर २०१९ रोजी दिलेल्या ५ लाख ७३ हजार ५४८ रुपयांच्या धनादेश अनादरप्रकरणी १० लाखांचा दंड, एका वर्षाची शिक्षा, दंड न भरल्यास तीन महिने शिक्षा ठोठावली आहे. तर १२ एप्रिल २०२० रोजी दिलेल्या १० लाखांच्या धनादेश अनादरप्रकरणी २० लाखांचा दंड व दंड न भरल्यास तीन महिन्यांची शिक्षा सुनावली आहे. १० जानेवारी २०२१ रोजी दिलेल्या १० लाखांच्या धनादेशप्रकरणी २० लाखांचा दंड व ३ महिन्यांची शिक्षा सुनावली आहे. दंड न भरल्यास तीन महिन्यांच्या शिक्षाही न्या. केळकर यांनी ठोठावली आहे.