जळगाव (प्रतिनिधी) जळगाव लोकसभा मतदार संघातील उमेदवार म्हणून पारोळ्याचे माजी नगराध्यक्ष करण पवार यांच्या नावावर ठाकरे गटाकडून शिक्कामोर्तब केल्याची माहिती समोर येत आहे. याबाबत करण पवार यांच्याशी थेट संपर्क साधला असता त्यांनी आगामी दोन दिवसात सगळं स्पष्ट होईल, अशी सूचक प्रतिक्रीया दिली आहे.
पारोळ्याचे माजी नगराध्यक्ष करण पवार यांनी ठाकरे गटाच्या पाठिंब्याने लोकसभेची निवडणूक अपक्ष लढण्याची तयारी दर्शवली होती; परंतु विधानसभेच्या दृष्टीनेही मशाल चिन्ह घराघरामध्ये पोहोचवणे गरजेचे असल्याने ठाकरे गटाने पवारांचा हा प्रस्ताव नाकारला होता. परंतू आता करण पवार यांनी थेट ठाकरे गटाची उमेदवारी घेण्याचा प्रस्ताव मान्य केल्याचे कळते. विशेष म्हणजे खासदार उन्मेष पाटील हे देखील त्यांना मदत करणार असल्याचे कळते. एवढेच नव्हे तर अमळनेरचे माजी आमदार शिरीष चौधरी हे देखील करण पवार यांच्याबाबतीत सकारात्मक असल्याची जोरदार चर्चा सुरु आहे.
जाणून घ्या…पडद्याआड सुरु असलेल्या घडामोडी !
विद्यमान खासदार उन्मेष पाटील यांचे तिकीट कापले गेल्यानंतर भाजपने मागील वेळी तिकीट मिळून ऐनवेळी उमेदवारी रद्द केलेल्या स्मिताताई वाघ यांना पुन्हा उमेदवारी जाहीर केली. त्यामुळे खासदार पाटील यांचा गट कमालीचा नाराज झाला. याच नाराजीचा फायदा ठाकरे गटाने घेण्याचे ठरवले आणि पडद्याआड घडामोडी सुरु केल्यात. राजकीय वर्तुळातील चर्चेनुसार सुरवातीला थेट उन्मेष पाटील यांच्यासोबत संपर्क करण्यात आला. उन्मेष पाटील यांनी पत्नी संपदा पाटील व पारोळा येथील त्यांचे मित्र माजी नगराध्यक्ष करण पवार यांचे नाव सुचवले. परंतू शेवटी करण पवार यांचे फायनल केले. त्यानंतर पवार यांच्या नावावर गांभीर्याने ठाकरे गटाने विचार करायला सुरुवात केली. अपक्ष की पक्षाचे चिन्ह?, यावर काही दिवस खलबतं झाली. अगदी शिवसेना ठाकरे गटाचे संपर्क संजय सावंत यांनी करण पवार यांच्या विजयाची राजकीय आकडेवारी मांडल्यानंतर ठाकरे गटाकडून पवारांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आल्याचे कळतेय.
अशी आहे शिवसेनेची रणनीती !
करण पवार हे पारोळ्याचे माजी नगराध्यक्ष नव्हेच तर शरद पवार गटाचे नेते तथा माजी पालकमंत्री डॉ. सतीश पाटील यांचे पुतणे आहेत. त्यामुळे त्यांचे राष्ट्रवादीच्या दोन्ही गटात अनेक मित्र आहेत. तसेच गतवेळी स्मिताताई वाघ यांच्या उमेदवारीला विरोध करून तिकीट रद्द करायला लावणारा भाजपातील नाराज गट देखील करण पवार यांना मदत करेल. तसेच खासदार उन्मेष पाटील हे करण पवार यांच्यासोबत उभे राहिल्यास त्यांना भाजपने लोकसभेसाठी तयार केलेली सर्व रणनीती आपोपाप वापरायला मिळेल. अगदी खासदार उन्मेष पाटील यांनी आपल्याला उमेदवारी जाहीर होईल, या अपेक्षेने भाजपच्या रणनीतीनुसार उभी केलेली यंत्रणा करण पवार यांनी ‘रेडी टू युज’ मिळेल, अशी देखील शिवसेनेची रणनीती आहे.
राजकीय पटलावर सुरु झाल्या अनेक खेळी !
ठाकरे गटाचे संपर्क संजय सावंत यांनी राजकीय पटलावर अनेक खेळी सुरु केल्या आहेत. त्यानुसार अमळनेरचे माजी आमदार शिरीष चौधरी हे सोबत आल्यास स्मिताताई यांना स्वतःच्या तालुक्यातच रोखून धरण्याची शिवसेनेची रणनीती आहे. परंतू शिरीष चौधरी हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मंत्री गिरीश महाजन यांचे निकटवर्तीय मानले जातात. त्यामुळे जोपर्यंत ते जाहीररित्या आपली भूमिका मांडत नाही. तोपर्यंत चित्र स्पष्ट होणार नाही. जळगावात आमदार राजुमामा भोळे आणि भाजपातील अंतर्गत नाराजीला आपल्यासाठी कशी उपयोगात आणता येईल, याची देखील चाचपणी शिवसेनेने केली असल्याचे कळते.