जळगाव (प्रतिनिधी) शहरालगत शिरसोली रोडवर असलेल्या रायसोनी कॉलेज जवळील टेकडीच्या जागेतून वारेमाप गौणखनिज काढण्याचे काम सुरु असल्याबाबत माध्यमांनी वृत्त मालिका प्रकाशित केल्यानंतर महसूल विभागात खळबळ उडाली होती. यानंतर जळगाव तहसीलदारांनी फक्त कारवाईचा फार्स केला. परंतू कारवाईच्या नावाखाली गोलमाल झाल्याची चर्चा आहे. कारण तहसीलदार यांनी मुरूम, यंत्र सामुग्री जप्त केलेच नसल्याचे बोलले जात आहे.
नाममात्र, कारवाई करण्यामागे कुणाचा दबाब?
रायसोनी कॉलेज जवळील गौणखनिज उत्खनन करण्याचा धडाका सुरु असून परवानगी शेकडो ब्रासची तर उत्खनन हजारो ब्रासचे असे चित्र आहे. यामुळे शासनाचा लाखो रुपयाचा महसुल बुडवण्याचे काम महसुल विभागाच्या काही कर्मचार्यांना हाताशी धरुन ठेकेदाराचा गोरखधंदा सुरु असल्याची चर्चा आहे. परंतू माध्यमांनी याविरुद्ध आवाज उठविल्यामुळे जळगाव तहसीलदार नामदेव पाटील यांना कारवाई करणे भाग पडले. परंतू कारवाई नावाला करून ठेकेदाराला वाचविण्याचा प्रयत्न झाल्याची उघड चर्चा खुद्द महसूल विभागातच सुरु आहे. तहसीलदार यांनी कारवाईच्या नावाखाली फक्त काम थांबवले आहे. वास्तविक बघता महसूलच्या काही अधिकाऱ्यांचे मते तहसीलदारांनी डंपर, पोकलेन जप्त केले गेले पाहिजे होते. तसेच मुरूमही जप्त करून सील करत ठेकेदारावा दंडात्मक कारवाई अपेक्षित होते. परंतू असे काहीही झाले नाही. त्यामुळे तहसीलदार नामदेव पाटील यांच्याकडून फक्त कारवाईचा फार्स झाल्याचा आरोप होत आहे. अशी नाममात्र, कारवाई का गेली?, याबाबत उलटसुलट चर्चा सुरु आहेत. कारण तहसीलदार नामदेव पाटील हे एक प्रामाणिक अधिकारी म्हणून ओळखले जातात. त्यामुळे या प्रकरणाकडे आता जिल्हाधिकारी अमन मित्तल यांनीच लक्ष घालावे, अशी मागणी सुज्ञ नागरीकांकडून केली जात आहे.
नेमकं काय आहे प्रकरण
शहरालगत शिरसोली रोडवर जी.एच. रायसोनी अभियांत्रिकी महाविद्यालय आहे. या महाविद्यालयाचा परिसर मोठा असून या परिसरालगतच महाविद्यालयाच्या मालकीचे मोठमोठे मुरुम असलेली टेकडी आहे. या ठिकाणाहून गेल्या काही दिवसांपासून मोठ्या प्रमाणात पोकलेन व जेसीबीच्या सहाय्याने गौणखनिजाचे उत्खनन सुरु आहे. या उत्खननासाठी परवानगी मात्र २०० ब्रासचीच घेण्यात आल्याचे समजते तर दिवसागणिकच शेकडो ब्रास गौणखनिज वाहिले जात आहे. गौणखनिज उत्खनानासाठी महसुल विभागाकडून परवानगीच्या नावाखाली २०० ब्रासची नाममात्र परवानगी काढण्यात येवून वरिष्ठ अधिकार्यांची दिशाभूल केली होती.
जिल्हाधिकारी अमन मित्तल यांना प्रकरणात लक्ष घालण्याची गरज
गेल्या काही दिवसांपासून येथून दोन मोठ्या डंपरच्या साहाय्याने दिवस आणि रात्र गौणखनिज वाहण्याचे काम सुरु आहे. सारासार विचार केला असता एका डंपरमध्ये ६ ब्रास मुरुम वाहिला जातो. दिवसभरात दोन डंपरच्या साहाय्याने सुमारे १५ ते २० फेर्या धरल्या तरी दिवसभरातच २०० ब्रासपेक्षा जास्त गौणखनिज येथून वाहिला जातो. याबाबत सत्यता पडताळणी असल्यास महाविद्यालय परिसरात असलेल्या सीसीटीव्ही फुटेज तपासल्यावर याची माहिती मिळू शकेल. या परिसरातून मोठ्या प्रमाणात गौणखनिज उत्खनन करत संबंधित गौणखनिज वाहणारा कंत्राटदार काही महसुल विभागाच्या कर्मचार्यांना हाताशी धरत हा आर्थिक हितगुज जोडून शासनाचा लाखो रुपयांचा महसुल बुडवत असल्याचे दिसत असून प्रत्यक्ष गौणखनिज उत्खनन केलेल्या जागेची मोजणी केल्यावर तेथे झालेला प्रकार उघडकीस येईल. याबाबत महसुल विभागाचे अपर जिल्हाधिकारी तसेच कर्तव्यदक्ष जिल्हाधिकारी अमन मित्तल यांनी संबंधित प्रकरणी गांभीर्याने लक्ष देवून योग्य ती कारवाई करावी, असा सूर सुज्ञ नागरीकांमधून निघत आहे.
ठेकेदारावर गुन्हा दाखल करण्याची मागणी
मोठ्या प्रमाणात कायद्याचे उल्लंघन केल्यानंतरही त्याच्याविरुद्ध कायदेशीर कारवाई का होत नाहीय?, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. वास्तविक बघता याबाबत महसूल विभागाने तात्काळ संबंधित ठेकेदाराला दंड आकारात गुन्हा दाखल केला पाहिजे होता. परंतू राजकीय दबावामुळे प्रकरण दडपण्याचा प्रयत्न होत असल्याची चर्चा आहे. धक्कादायक म्हणजे याच ठेकेदारवर धरणगाव तहसील कार्यालयात अवैध गौणखनिज उत्खनन बाबत ७ ते ८ लाखांचा आकारलेला दंड प्रलंबित असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.