नशिराबाद (प्रतिनिधी) भांडणाच्या वादातून झालेल्या मारहाणीनंतर कंडारीतील युवकाचा मृत्यू झाला होता. प्रकरण अंगाशी नको यायला म्हणून संशयितांनी मृतदेह पाटचारीजवळ टाकला. मात्र, एमआयडीसी पोलिसांनी तपासात हा प्रकार खुनाचा असल्याचे उघड केले आहे. या प्रकरणी संशयिताला अटक करण्यात आली आहे.
या घटनेत कंडारीतील राहुल उर्फ गोलू युवराज भील (22) या युवकाचा मृत्यू झाला आहे. तर पोलिसांनी जयराम धोंडू कोळी (38, कंडारी) आणि भूषण उर्फ भुरा पाटील (24, रा.वराडसीम) यांना बेड्या ठोकल्या आहेत. दरम्यान, जयराम याची गुन्हेगारी पार्श्वभूमी असून त्याच्याविरोधात नशिराबाद येथे गुन्हे दाखल आहे. तर भूषण हा भुसावळातील पथकात होमगार्ड असल्याची माहिती सूत्रांनी दिली. 2 जुलै 2023 रोजी राहुल उर्फ गोलू युवराज भील हा तरुण जळगाव तालुक्यातील कंडारी येथून सकाळी दहा वाजेच्या सुमारास घराबाहेर पडल्यानंतर बेपत्ता झाल्याने त्याचा शोध सुरू होता तर नशिराबाद पोलिसात हरवल्याची नोंद करण्यात आल्यानंतर याच दिवशी सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास राहुलचा मृतदेह जळगाव शिवारातील रायपूर परीरसरातील पाटचारीजवळ संशयास्पदरीत्या आढळला. गोलूचा खून झाल्याचा संशय व्यक्त केला जात असताना एमआयडीसी पोलिसांनी तपासचक्रे फिरवत गुन्ह्याची उकल केली.
जयराम कोळीचा राहुल उर्फ गोलू याच्याशी वाद झाल्याची माहिती समोर आल्यानंतर हाणामारीच्या ठिकाणी जयराम धोंडू कोळी याचा मित्र भूषण उर्फ भुरा पाटील (रा.वराडसीम, ता.भुसावळ) हा देखील असल्याचे स्पष्ट झाले. भूषण पाटील यास ताब्यात घेताच त्याने गुन्ह्याची कबुली दिली. 2 जुलै रोजी रात्रीच्या वेळी साडे आठ वाजेच्या सुमारास कंडारी गावातून राहुल यास मोटारसायकलवर बसवून मारहाण करण्यात आली. या मारहाणीत राहुल हा जागीच मरण पावल्यानंतर संशयितांनी त्याचा मृतदेह पाटचारीच्या खाली दोन्ही बाजूने दगड लावून पाईपात लपवल्याची कबुली दिली व जयराम याने राहुलच्या अंगावरील कपडे काढून ते कुठेतरी फेकुन दिल्याची कबुली दिली. या प्रकरणी राहुलचे वडील युवराज दलपत भिल यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार एमआयडीसी पोलिसात खुनाचा गुन्हा दाखल करून तो नशिराबाद पोलिसात वर्ग करण्यात आला. दरम्यान, जयराम यास यापूर्वीच एका गुन्ह्यात अटक करण्यात आल्यानंतर मंगळवारी भूषण यास अटक करून नशिराबाद पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.
एमआयडीसी पोलीस ठाण्याचे निरीक्षक जयपाल हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक अनिस शेख, पोलीस उपनिरीक्षक रवींद्र गिरासे, सहाय्यक फौजदार अतुल वंजारी, सचिन मुंढे, रामकृष्ण पाटील, किशोर पाटील, ईमान सैय्यद, तुषार गिरासे, सुधीर साळवे, गोविंदा पाटील, मुदस्सर काझी, सचिन पाटील,साईनाथ मुंढे, पोलीस चालक ईम्तियाज खान, चालक मनोज पाटील, जगदीश भोई आदींनी गुन्हा उघडकीस आणला.