जळगाव (प्रतिनिधी) कोविडच्या पार्श्वभूमीवर यावर्षी दिनांक १ जानेवारी, २०२१ रोजी जयस्तंभ पेरणेफाटा येथे होणाऱ्या अभिवादन कार्यक्रमाचे दूरदर्शनवरुन थेट प्रक्षेपण करण्यात येणार आहे. जळगाव जिल्ह्यातील सर्व अनुयायांनी दिनांक १ जानेवारी, २०२१ रोजी जयस्तंभ पेरणेफाटा येथे न जाता घरातूनच जयस्तंभास अभिवादन करावे. असे आवाहन जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी केले आहे.
राज्यात तसेच जिल्ह्यात अजूनही कोरोनाचे रुग्ण आढळून येत आहे. यावर्षी कोविड या संसर्गजन्य रोगाचा प्रादुर्भाव विचारात घेता गेल्य सात-आठ महिन्यात आलेले सर्वधर्मीय सण/उत्सव अत्यंत साध्या पध्दतीने व लोकांनी एकत्रित न येता साजरे केलेले आहेत. १ जानेवारी, १८१८ रोजी कोरेगाव भीमा येथे झालेल्या युध्दामध्ये कामी आलेल्या व जखमी झालेल्या योध्यांच्या स्मरणार्थ सन १८२२ साली पेरणे, ता. हवेली, जि. पुणे येथील भिमा नदीच्या तीराजवळ जयस्तंभ उभारण्यात आलेला आहे. जिल्ह्यात कोविड संसर्गाचा विचार करता सर्व अनुयायांनी विचारपूर्वक व धैर्याने वागून जयस्तंभ पेरणे येथे न जाता साध्या पध्दतीने प्रतिकात्मक स्वरुपात अभिवादन करण्याचा कार्यक्रम गर्दी न करता घरी राहूनच करावा. असे राऊत, जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष, आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, जळगाव यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.