वर्धा (वृत्तसंस्था) येथील बसस्थानकावर महिलेच्या पर्समधील एक लाख 15 हजार रुपये किमतीचे दागिने व रोकड अज्ञात चोरट्यांनी लांबवल्याची शुक्रवार, २० सप्टेंबर रोजी घडली आहे.
कुरझडी येथील रहिवासी असलेल्या लता जीवन देवतळे (३६) ह्या शुक्रवार, २० सप्टेंबर रोजी वर्धा शहरात आल्या होत्या. गावी परत जाण्याकरिता वर्धा बसस्थानकावर पोहोचल्या. गाडी येताच प्रवाशांची गर्दी झाली. त्या गर्दीत अज्ञात चोरट्याने मोठ्या पर्समध्ये ठेवून असलेली दागिन्यांची लहान पर्स अलगद उघडली आणि त्यातील १ लाख १५ हजार रुपये किमतीचे सोन्याचांदीचे दागिने व रोख रक्कम असलेली छोटी लंपास केली. लता देवतळे ह्या गाडीमध्ये चढल्यानंतर त्यांच्या लक्षात आले की, पर्सची चेन उघडी असल्याचे लक्षात आले. तसेच पर्समधील सोन्या-चांदीचे दागिने असलेली लहान पर्स चोरीस गेल्याचे निदर्शनास आले. लता देवतळे यांनी लागलीच शहर पोलिसांकडे तक्रार दिली.