छत्रपती संभाजीनगर (वृत्तसंस्था) उसने घेतलेले साडेसात हजार रुपये परत दे, असा तगादा लावल्याने संतापलेल्या शीघ्रकोपी तरुणाने मित्राची गोळी झाडून हत्या केल्याची खळबळजनक घटना बुधवारी (दि. ९) रात्री ७.३० वाजता बायजीपुऱ्यात घडली. हमद सलेह अब्दुल्ला कुतूब (२४, रा. गल्ली नं. १४ बायजीपुरा) असे मृत तरुणाचे नाव आहे. या गोळीबारात रिक्षाचालक समीर पठाण जखमी झाला आहे. तर फैयाज पटेल (रा. गल्ली नं. २१. बायजीपुरा) असे गोळीबार करणाऱ्या आरोपीचे नाव असून, तो फरार झाला आहे.
नेमकं काय घडलं !
बायजीपुराच्या मुख्य रस्त्यावरील हयात क्लिनिक आणि आरएमएस फार्मा नावाच्या दुकानासमोर मयत हमद चाऊस आणि संशयित आरोपी फैयाज पटेल यांच्यात जुन्या देवाण- घेवाणवरून बुधवारी रात्री ७.३० ते ८ वाजेदरम्यान वाद झाला. या वादानंतर फैयाजने सोबत आणलेल्या गावठी कट्ट्यातून हमद चाऊस याच्यावर गोळीबार केला. जवळून केलेल्या या गोळीबारामुळे हमद चाऊस गंभीररीत्या जखमी झाला. त्याच्यावर गोळीबार करण्याच्या इराद्याने फैयाजने पुन्हा गोळी चालवली. मात्र, ती हयात क्लिनिकमधील एका रुग्णाच्या नातेवाईकाला लागली. हमदला वाचवण्यासाठी काही तरुण धावत आले. लोक जमा असल्याचे पाहून मारेकरी फैयाज घटनास्थळावरून पळून गेला. बायजीपुऱ्यात या घटनेने खळबळ उडाली आहे. तर जखमी तरुणाला उपचारासाठी खाजगी रुग्णालयात दाखल आले आहे.
या घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक रामेश्वर रेंगे तसेच विशेष पथकाचे पोलीस कर्मचारी पोहोचले होते. मारेकरी फैयाज पटेलवर यापूर्वी अनेक गुन्हे असल्याची माहिती पोलिसांनी दिली. ही घटना समजतात घटनास्थळी पोलीस आयुक्त मनोज लोहिया, पोलीस उपायुक्त शीलवंत नांदेडकर तसेच विविध ठाण्यांचे पोलीस निरीक्षक पोहोचले होते. आरोपीला पकडण्यासाठी विशेष पथके तयार करण्यात आली.
थरार सीसीटीव्हीत कैद !
हमद हा हयात क्लिनिकच्या समोर बसलेला असताना समोरच्या गल्लीतून आरोपी फैयाज पटेल आला. त्याने बुद्ध विहारासमोरच खिशातून गावठी कट्टा काढून तेथूनच हमदच्या दिशेने पहिली गोळी झाडली. मात्र, त्याचा निशाना चुकला आणि गोळी शटरवर लागली. या गोळीबारात रिक्षाचालक जखमी समीर बशीर पठाण हा जखमी झाला आहे. त्याच्या डाव्या हातावर गोळी लागली असून खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
लग्न असल्याने पैसे लवकर मागितल्याचा राग !
अवघ्या चार दिवसांपूर्वी मयत हमद चाऊसने फैयाज पटेल याला साडेसात हजार रुपये मागितले होते. लग्न असल्याने पैसे लवकर दे, अशी तंबीदेखील दिली होती. पैसे परत मागितल्याचा राग मनात ठेवून फैयाजने हमदसोबत वाद घालून ‘तेरा गेम करूंगा, तेरेकू गोली मारुंगा’, अशी धमकी दिली होती. हमद चाऊसला मारण्यासाठी फैयाजने चार दिवसांपूर्वी कट्टा आणल्याची चर्चा आहे.
मयताच्या छातीवर आणि तोंडावर लाथा मारल्या !
गोळ्या घातल्यानंतरही फैयाजचा राग शांत झाला नाही. त्याने मयताच्या छातीवर आणि तोंडावर लाथा मारल्या. काळ्या पठाणी ड्रेसमध्ये फिल्मी स्टाईलने आरोपी घटनास्थळावर आला. त्याने हमदला ‘मेरी बहुत बेइज्जती करता तू, भाईको पैसे मंगता.. अब तेरा खेल खल्लास, असा डायलॉग मारत गोळ्या झाडल्या. या प्रकारानंतर एका व्यक्तीने फैयाजला घटनास्थळावरून काढून दिले.
अकरा दिवसांनंतर होणार होते लग्न
मयत हमद चाऊस हा कापड दुकानावर काम करत होता. त्याच्या घरी त्याची वृद्ध आई होती. येणाऱ्या २० तारखेला त्याचे लग्न होणार होते. या लग्नासाठी तयारी करण्यात येत असलेल्या ड्रेसचे माप देऊन तो मित्राला भेटायला निघाला होता.