धरणगाव (प्रतिनिधी) आषाढी एकादशीच्या निमित्ताने ज्या प्रमाणे वारकऱ्यांना माऊलीच्या भेटीची ओढ असते, त्याचप्रमाणे पी. आर. हायस्कूलच्या वाटेवर 1997 च्या एस.एस.सी. बॅचचे माजी विद्यार्थी आपली शाळा गाठत उत्साहाने दाखल झाले. पी. आर. हायस्कूल शाळेत येऊन माजी विद्यार्थ्यांनी मार्च 2025 च्या एस.एस.सी. परीक्षेत गुणवंत ठरलेल्या विद्यार्थ्यांचा विशेष सत्कार करण्याचा उपक्रम हाती घेतला.
या कार्यक्रमाचे आयोजन पी. आर. हायस्कूलच्या वतीने करण्यात आले होते. अध्यक्षस्थानी संस्थेचे मानद सचिव डॉ. मिलिंद डहाळे होते. प्रमुख अतिथी म्हणून विभागीय आयुक्त मा. विशाल मकवाने, सुनील पाटील, प्रा. रविंद्र मराठे, सुशील कोठारी, दीपक केले, बिस्मिल्ला शेख, भटू पाटील, ज्ञानेश्वर चौधरी, पर्यवेक्षक डी. एच. कोळी यांची उपस्थिती लाभली.
कार्यक्रमात एस.एस.सी. परीक्षेत प्रथम क्रमांक पटकावणाऱ्या कु. अवंती पिंपळगावकर हिला 50 ग्रॅमचे चांदीचे पदक, खुश पवार यास 30 ग्रॅमचे तर किर्ती महाजन हिला 20 ग्रॅमचे चांदीचे पदक तसेच प्रशस्तीपत्र व गुलाब पुष्प देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी वेदांत सोनी, कुणाल कोळी, मानवी चौटे, साक्षी पाटील, वैष्णवी भोई, कांचन शिंदे यांचा ‘करिअर सारथी’ हे मार्गदर्शनपर पुस्तक व गुलाब पुष्प देऊन सत्कार करण्यात आला.
विभागीय आयुक्त विशाल मकवाने यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की, “मनाची स्वच्छता ठेवा, स्वप्नं पहा आणि यशाच्या शिखरापर्यंत पोहोचण्यासाठी सातत्य ठेवा. मोबाईल व स्क्रीन टाइमवर मर्यादा ठेवा. प्रामाणिक प्रयत्न आणि चिकाटीनेच यश मिळवता येते.” आपल्या शालेय आठवणींनाही त्यांनी यावेळी उजाळा दिला.
अध्यक्षीय भाषणात डॉ. डहाळे यांनी विद्यार्थ्यांना प्रेरणा देताना, “या शाळेत आपण घडलो, शाळेचे आणि शिक्षकांचे ऋण विसरू नका,” असे सांगितले. 1997 च्या बॅचने घेतलेला पुढाकार हे दातृत्वाचे उत्तम उदाहरण असल्याचे त्यांनी नमूद केले.
सूत्रसंचालन व प्रास्ताविक जेष्ठ शिक्षक गणेशसिंह सूर्यवंशी यांनी केले. तर आभार प्रदर्शन पर्यवेक्षक डी. एच. कोळी यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी रामचंद्र धनगर, डॉ. बापू शिरसाठ, प्रशांत महाजन, प्रदीप असोदेकर, संदीप घुगे, राजेश खैरे, सुरेखा तावडे, सुरेंद्र सोनार, संजय बेलदार, गोपाळ चौधरी, गोपाळ सोनवणे, नवनीत सपकाळे, प्रमोद पाटील, महेश पाठक, जितू दाभाडे, मिलिंद हिगोनेकर, योगेश नाईक यांचे मोलाचे सहकार्य लाभले.
कार्यक्रमाचा समारोप शाळा व संस्थेच्या वतीने मा. विशाल मकवाने व सर्व मान्यवरांचे शाल, श्रीफळ व बुके देऊन सन्मान करून करण्यात आला.