नागपूर (वृत्तसंस्था) मुक्ताईनगर तालुक्यातल्या सातोड शिवारातील ३३ हेक्टर ४१ आर जमीनीतून करण्यात आलेल्या उत्खननात तब्बल ४०० कोटींचा घोटाळा झाला आहे. धक्कादायक म्हणजे राष्ट्रवादीचे नेते एकनाथराव खडसे यांच्या पत्नी मंदाताई खडसे यांच्या नावाने ही जामीन खरेदी झाल्याचा आरोप आमदार चंद्रकांत पाटील यांनी आज विधानसभेत करून प्रचंड खळबळ उडवून दिली आहे.
नेमकं काय म्हणाले आमदार पाटील !
आमदार चंद्रकांत पाटील यांनी आज विधानसभेत लक्षवेधी मांडली होती. त्यानुसार “मौजे सातोड ता.मुक्ताईनगर येथील गट नंबर २२५ /२/३, २२५/२/२, २२५/२/१, २२५/१/१, २२५/१/२ हा एक संपूर्ण गट मुंबई नागपूर राष्ट्रीय महामार्गाला लागून असून जवळपास ४४ हेक्टरचा असून संपूर्ण गट मुरमाच्या टेकडीचा आहे. संबंधित गट धारकाने शासनाची कुठलीही परवानगी न घेता सदरील टेकडीवर असलेले झाडांची कत्तल करून या टेकडीचे अवैधरित्या उत्खनन करून कुठलाही गौण खनिज परवाना न घेता जवळपास २ लक्ष ब्रास पेक्षा जास्त गौण खनिज उत्खनन केले.
कोट्यांवधी रुपयांचा भ्रष्टाचार !
उत्खननानंतर निघालेले गौण खनिजाची उचल करून महाराष्ट्र शासनाच्या मृद व जलसंधारण विभागाच्या दिनांक २९ नोव्हेंबर २०१७ च्या शासन निर्णय क्रमांक संकीर्ण-२०१६ प्रक २२७ जल एक, मंत्रालय मुंबई चा आधार घेऊन शासन निर्णयातील नमूद कार्यपद्धतीचा अवलंब न करता तसेच अटी शर्ती व शासनाने ज्या उद्देशाने शासन निर्णय केला तो उद्देश बाजूला ठेवून लाखो ब्रास अवैध गौण खनिज उत्खनन करून त्या गटधारकाने त्याचा राजकीय दबाव वापरून शासनाचा जवळपास ४०० कोटी रुपयांचा महसूल बुडवून उत्खनन करून त्यातून निघालेले गौणखणीज मुंबई नागपूर राष्ट्रीय महामार्गाचे काम करीत असलेल्या गावर कन्स्ट्रक्शन कंपनीला विक्री करून कोट्यावधी रुपयांची कमाई केली. या गट धारकाने कोट्यावधी रुपयांचा भ्रष्टाचार केला आहे.
एसआयटीच्या माध्यमातून चौकशीची मागणी !
या प्रकरणाची एसआयटीच्या माध्यमातून चौकशी करण्यात यावी अशी मागणी देखील त्यांनी केली. त्यावर महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी महसूल खात्याच्या माध्यमातून याची चौकशी करण्यात येईल अशी घोषणा केली.तसेच त्यांनी एसआयटीचे आश्वासन देखील दिले.