जळगाव (प्रतिनिधी) माजी मंत्री एकनाथराव खडसे लवकरच जिल्ह्यात आमदार नव्हे तर नामदार म्हणून परततील, असे प्रतिपादन राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष रवींद्र भैय्या पाटील यांनी केले आहे. दरम्यान, या वक्तव्यामुळे खडसे समर्थकांसह राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
कृषी विद्यालयाच्या सभागृहात राष्ट्रवादीचे नेते तथा माजी महसूल मंत्री एकनाथराव खडसे यांचा दि. २ सप्टेंबर रोजी त्यांच्या ६९ व्या वाढदिवसानिमित्त निंभोरा परीसरातील राष्ट्रवादी प्रेमींनी २ ते ९ सप्टेंबर दरम्यान वाढदिवस सप्ताहाचे नियोजन जाहीर केले आहे. त्याप्रसंगी रवींद्रभैय्या पाटील बोलत होते. यावेळी श्री. पाटील म्हणाले की, झाड माझ्या नाथाभाऊंचे हा उपक्रम कौतुकास्पद असून हा निंभोरा पॅटर्न जळगाव जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे राबविण्यात येणार असून माजी मंत्री एकनाथराव खडसे लवकरच जिल्ह्यात आमदार नव्हे तर नामदार म्हणून परततील. तसेच जिल्ह्यात वृक्षारोपण कार्यक्रम, पक्षसंघटन, शाखा उद्घाटन, सदस्य नोंदणी अभियान, जनहितार्थ योजनांसाठी शिबीर, युवकांसाठी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन शिबीर, महिलांच्या बचत गटांसाठी व्यावसायिक मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले असल्याचेही श्री. पाटील यांनी सांगितले. या प्रसंगी जिल्हाध्यक्ष रवींद्र पाटील, माजी आमदार अरुण पाटील, ओबीसी सेलचे जिल्हाध्यक्ष उमेश नेमाडे, जिल्हा किसान सभेचे अध्यक्ष सोपान पाटील, रमेश पाटील, माजी नगरसेवक अशोक लाडवंजारी, राजेश वानखेडे, प्रकाश पाटील, प्रल्हाद बोंडे, नीलकंठ चौधरी, दिपक पाटील, शेख मेहमूद, गुणवंत नीळ, दिगंबर चौधरी, सचिन महाले आदि उपस्थित होते.
















